Mon, Aug 19, 2019 07:52होमपेज › Belgaon › वादळी पावसाने जनजीवन विस्कळीत

वादळी पावसाने जनजीवन विस्कळीत

Published On: Jun 04 2018 1:03AM | Last Updated: Jun 03 2018 11:06PMबेळगाव : प्रतिनिधी

सलग दोन दिवस झालेल्या वादळी पावसाने शहर परिसरासह जनजीवन विस्कळीत झाले आहे. ठिकठिकाणी पडलेल्या फांद्या, विद्युत व टेलिफोन खांब हटविण्याच्या प्रतीक्षेत आहेत. पावसाळ्यापूर्वी गटारी स्वच्छ न केल्याने सखल भागात असलेल्या घरात पाणी शिरले. पावसाळ्यापूर्वी शाकारणीचे काम हाती घेतलेल्या कौलारु घरात पावसाचे पाणी शिरल्याने संसारोपयोगी वस्तू पाण्यात भिजल्या आहेत. 

शहर उपनगरात वादळी पावसाने दोन दिवस थैमान घातले. अचानक आलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. ठिकठिकाणी झाडाच्या फांद्या वीजवाहिन्यांवर पडल्यामुळे विद्युत पुरवठा ठप्प झाला. सुमारे तीन तासाच्या अथक परिश्रमाने काही भागात वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. घरावर फांदी पडून चव्हाट गल्लीतील सुशीला धमुणे यांच्या घराचे नुकसान झाले. वनखात्याला कळवूनदेखील अजूनही फांदी बाजूला करण्यात आलेली नाही, अशी माहिती त्यांनी दिली. 

शहरात ठिकठिकाणी फांद्या पडून हेस्कॉमचे नुकसान झाले होते. तेदेखील हटविण्यास दोन दिवसाचा अवधी लागला. पावसाळ्यापूर्वी कौलारु घर शाकारण्याचे काम हाती घेण्यात आले होते. त्या नागरिकांच्या वादळी पावसाचे पाणी थेट घरात आले. यामुळे ताडपत्री झाकून पावसापासून बचाव करण्याचा प्रयत्न केला. मोठा वादळी पाऊस झाल्याने घरावर कायमस्वरुपी गळतीचा प्रश्‍न मिटविण्यासाठी घरावर पत्रे घालणे पसंत केले.  
गटारी साचल्याने सखल भागात पाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आले. सखल भागातील घरात पाणी घुसल्याने ते बाहेर काढण्यासाठी अथक परिश्रम घ्यावे लागले. सध्या पाऊस ओसरला असला तरी अद्याप पावसाळी वातावरण कायम आहे. मान्सूनची चाहुल लागली असून शहर व  ग्रामीण भागातील शेतकर्‍यांचा वावर शिवारात वाढला आहे. 

विद्युत व टेलिफोन खांब, फांद्या, गटारीत तुंबलेला कचरा, गाळ मनपा कधी काढणार, असा प्रश्‍न नागरिक करत आहेत.