Sun, Apr 21, 2019 13:53होमपेज › Belgaon › तिसरे गेट उड्डाणपुलाचे काम जुलैपासून

तिसरे गेट उड्डाणपुलाचे काम जुलैपासून

Published On: Jun 06 2018 1:41AM | Last Updated: Jun 06 2018 12:01AMबेळगाव : प्रतिनिधी

शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणार्‍या दोन उड्डाणपुुलांचे काम पूर्ण तर तिसरा निर्मितीआधीन असतानाच चौथ्या पुलाची तयारी रेल्वे प्रशासनाने केली आहे. तिसर्‍या रेल्वे गेटवर हा उड्डाणपूल उभारला जाणार असून, त्याचे काम येत्या 15 जुलैपासून सुरू करण्याची तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. या पुलामुळे उद्यमबाग आणि टिळकवाडी एकमेकांशी विनाअडथळा जोडले जातील.

सध्या गोगटे चौकातील ओव्हरब्रीजचे काम सुरू आहे. तर कपिलेश्‍वर परिसर आणि जुन्या धारवाड रोडवरील शिवराय उड्डाणपूल वाहतुकीला खुले झाले आहेत. गोगटे चौक पुलाचे काम काही महिन्यांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत तिसर्‍या गेट पुलाचे कामही सुरू होईल. शहरातील हा चौथा पूल असेल. त्यानंतर पहिल्या आणि दुसर्‍या रेल्वेगेट दरम्यान आणखी एक उड्डाणपूल उभारला जाणार आहे.

खा. सुरेश अंगडी यांनी मंगळवारी रेल्वे खात्याच्या अधिकार्‍यांच्या बैठकीत तिसर्‍या गेट पुलाचे काम 15 जुलैपासून  सुरू करा, असे बजावले आहे. जुलै मध्यावर जोरदार पावसाची शक्यता गृहित धरली तर जुलैअखेरपर्यंत तरी काम सुरू होऊ शकेल, असे संकेत आहेत. 

अंतिम टप्पा अन् सुरुवात

सध्या शहरातील गोगटे चौक उड्डाणपुलाचे काम जोमाने सुरू असून 30 सप्टेंबरपर्यंत पूल तयार चिन्हे आहेत.  शहरात कपिलेश्‍वर उड्डाणपूल हा नव्याने बांधण्यात आलेला पहिला पूल. त्याआधी ब्रिटिशांनी 1904 साली बांधलेला गोगटे ओव्हरब्रीज सोडला तर शहरात उड्डाणपूल नव्हता. कपिलेश्‍वर उड्डाणपूल गेल्या मे महिन्यात वाहतुकीला खुला झाला. त्याचे बांधकाम अंतिम टप्प्यात असतानाच जुन्या धारवाड रोडवरील पुलाचे काम सुरू करण्यात आले होते.

याच उदाहरणाप्रमाणे गोगटे चौक पुलाचे काम आता अंतिम टप्प्यात असून, आता तिसरे गेट पुलाचे कामही सुरू होईल.

खा. अंगडी यांनी रेल्वे खात्याच्या अधिकार्‍यांना याबाबत सूचना दिल्या. 15 जुलैपासून उड्डाणपूल कामाची सुरुवात करावयाची असून त्यानुसार अधिकार्‍यांनी तयारी करावी. कामाचा आवश्यक आराखडा तयार करावा.  आजुबाजुची अतिक्रमणे हटविण्याबरोबरच अन्य बाबीमध्ये सहकार्य करावे,असे अधिकार्‍यांना सूचवण्यात आले आहे. 

वाहतूक वळवावी लागणार

पूल उभारणीच्या कामाला सुरूवात झाल्यानंतर टिळकवाडी-उद्यमबागदरम्यान वाहतुकीची समस्या निर्माण होणार आहे. त्यामुळे या रस्त्यावरून असणारी  मोठी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याची कसरत पोलिसांना करावी लागेल. दुसर्‍या आणि पहिल्या रेल्वे गेटवर त्याचा ताण येईल. अशा स्थितीत पहिल्या रेल्वे गेटवरील बॅरिकेड काढण्याची गरज भासू शकते. पोलिस प्रशासनाने या भागातील वाहतूक कोणत्या प्रकारे वळविता येईल, याची तयारी करावी असेही सूचवण्यात आले आहे.

पाचवा पूल नंतर

तिसरे रेल्वे गेट उड्डाणपुलाच्या सुरुवातीनंतर पहिल्या व दुसर्‍या रेल्वे गेटच्या उड्डाण पूल उभारणीला सुरुवात करण्यात येणार आहे . परंतु, मनपाने याबाबतचा अधिकृत प्रस्ताव दिलेला नाही. यामुळे हे काम त्यानंतर हाती घेण्यात येणार आहे.