Sat, Apr 20, 2019 07:55होमपेज › Belgaon › तांदळाचे ‘भाग्य’श्रीमंतांच्या ताटात  

तांदळाचे ‘भाग्य’श्रीमंतांच्या ताटात  

Published On: Jan 11 2018 1:05AM | Last Updated: Jan 11 2018 12:13AM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी

राज्य सरकारने गोरगरिबांसाठी प्रारंभ केलेल्या ‘अन्‍न भाग्य’ योजनेतील तांदूळ श्रीमंतांच्या घशात जात असल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. अधिकारी व श्रीमंत उद्योजकांच्या संगनमताने गरिबांना मिळायचा तांदूळ भेसळ करून दुप्पट रकमेला विकला जात असल्याचे प्रकरण सीसीबी पोलिस व अन्‍न व नागरी पुरवठ्याच्या अधिकार्‍यांनी  बुधवारी टिळकवाडीतील राईस मिलवर छापा टाकून उघडकीस आणलेे. छाप्यात अन्‍न भाग्य योजनेतील 100 क्‍विंटल तांदूळ जप्त करण्यात आला आहे.

तिसर्‍या रेल्वेगेटजवळ असणार्‍या राजशेखर चोण्णद यांच्या ओम ब्रँड राईस मिलवर बुधवारी सायंकाळी छापा टाकण्यात आला. यामध्ये 100 क्‍विंटल तांदूळ आणि 100 क्‍विंटलपेक्षा अधिक भात जप्त करण्यात आला आहे. दोघांना अटकही करण्यात आली आहे. योजनेतील तांदूळ राईस मिलला पुरवठा करणारा वाहनचालक जगदीश गोळाप्पा दंडीन (रा. सत्तीगेरी, ता. सौंदत्ती), सय्यद फकरूसाब जिडीमनी (रा. यादवाड, ता. गोकाक) या दोघांसह वाहनही ताब्यात घेण्यात आले आहे. 

शेतकर्‍यांकडून खरेदी करण्यात आलेले भात राईस मिलमध्ये आणून त्याचा तांदूळ केला जातो. या तांदळाला पॉलिश करून त्यामध्ये अन्‍न भाग्य योजनेतील तांदूळ मिसळून विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यावरून बुधवारी सायंकाळी अनाधिकृतरीत्या अन्‍नभाग्य योजनेतील तांदूळ खरेदी करून राईस मिलला पुरवठा करण्यात येणार्‍या वाहनांचा पोलिसांनी पाठलाग करून  ओम राईस मिल येथे पुरवठा होत असल्याची माहितीची खातरजमा केली. ही माहिती अन्‍न व नागरी पुरवठा खात्याच्या उपसंचालिका सईदाबानू यांनी दिली.