Mon, Feb 18, 2019 05:25होमपेज › Belgaon › शहरात गांजा विक्री करणार्‍यांवर छापा

शहरात गांजा विक्री करणार्‍यांवर छापा

Published On: Jun 19 2018 1:33AM | Last Updated: Jun 18 2018 11:34PMबेळगाव : प्रतिनिधी

पोलिसांनी गांजाविरोधी मोहीम तीव्र करताना शहराच्या मध्यवर्ती भागातून काही गांजाविक्रेत्यांना ताब्यात घेतले आहे. त्यात एका बालकाचा समावेश आहे. पोलिसांनी स्वतः ग्राहक बनूनह गांजा विकणार्‍यांना जाळ्यात घेतले.

शहरामध्ये अनेक गैरव्यवहार सुरू असून शहरात अंमली पदार्थ व गांजा विक्री तेजीत आहे. याप्रकरणी मार्केट पोलिस स्थानकात तक्रारही दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांनी गांजा विक्री करणार्‍यांविरोधात जोरदार तपासकार्य हाती घेतले आहे. 

त्याच मोहीमेचा भाग  म्हणून सोमवारी शहराच्या मध्यवर्ती भागात कारवाई करण्यात आली. एका कॉम्प्लेक्समध्ये गांजा विकला जातो, अशी माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ग्राहक बनून या विक्रेत्यांना गाठले आणि गांजाची मागणी केली. त्यांना एका कॉम्प्लेक्समधील खोलीत नेण्यात आले. तेथे काही विक्रेते होते. तसेच काही खरेदीदारही होते. मुद्देमाल आणि विक्रेते सापडताच पोलिसांनी खरे रुप प्रकट केले आणि त्यांना रंगेहात ताब्यात घेतले. 

खडेबाजार पोलिस स्थानकाच्या व्याप्तीत येणार्‍या सदर भागात गांजा विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना उपलब्ध झाली होती. याबाबत खडेबाजार पोलिस स्थानकात रात्री उशिरापयंर्ंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश असल्याचे पुढे आले आहे. पोेलिसांनी काही दिवसांपूर्वीच शहरातील माळमारुती पोलिस स्थानकाच्या व्याप्तीत व शहरातील इतर काही भागामध्ये गांजा विक्री करणार्‍यांना रंगेहात पकडून कारवाई केली होती.