Mon, May 20, 2019 18:47होमपेज › Belgaon › ‘ती’ विहीर जीव गमावण्यासाठी आहे का? 

‘ती’ विहीर जीव गमावण्यासाठी आहे का? 

Published On: Feb 02 2018 11:44PM | Last Updated: Feb 02 2018 11:30PMबेळगाव ः प्रतिनिधी

 तिसरे रेल्वे गेट ते पिरनवाडी  क्रॉसपर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण करून विकास करण्यात आला आहे. याच रस्त्यावर तिसर्‍या रेल्वेगेट शेजारी या रस्त्यावरील फुटपाथच्या मधोमध असलेल्या पडक्या विहिरीच्या सभोवताली संरक्षण व्यवस्था नसल्याने  गुरुवारी रात्री पादचारी पडून जखमी झाला. आता प्रशासन खडबडून जागे झाले आहे. मनपाच्या या गलथान कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. जीव गमावण्यासाठी विहीर खुली सोडली का, असा प्रश्‍न विचारण्यात येत आहे.

गुरुवारी रात्री पादचारी अचानक गायब झाल्याची बाब निदर्शनास येताच सामाजिक भान असणार्‍या व्यक्तींकडून जखमी झालेल्या अल्लाबक्ष पिरजादे यांचे प्राण वाचविणे शक्य झाले. 

मनपाचा गलथान कारभार चर्चेत आला आहे. पादचार्‍यांना रस्त्याकडेने ये - जा करण्यास सोयीचे व्हावे, या उद्देशाने सोडण्यात आलेल्या रस्त्याकडेच्या फुटपाथच्या मधोमध असणार्‍या पडक्या विहिरीची कोणतीच दखल घेण्यात आली नसल्याबद्दल नागरिकांतून आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तिसरे रेल्वे गेटमधून बाहेर पडून उद्यमबागकडे जाणार्‍या पादचार्‍यांना या फुटपाथवरूनच जावे लागते. मधोमध सोडलेल्या विहिरीला संरक्षण भिंत अथवा लोखंडी जाळी बसविण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. याकडे दुर्लक्षच झाले आहे. याबद्दल नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. अशा आणखी कुठे  विहिरी असतील तर त्यांचा शोध घेऊन दुर्घटना घडण्यापूर्वीच दक्षता घेण्याची मागणी करण्यात येत आहे.

शेतकर्‍याचा दिलदारपणा 

विहिरीत पडलेल्याला पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. यामध्ये अनेकजण मोबाईलद्वारे व्हिडीओ काढण्यात गुंग होते. मात्र गर्दीतील युवकांनी पुढाकार घेऊन विहिरीत उतरण्याचे धाडस दाखविले. याबद्दल तेथे उपस्थित असलेल्या एका शेतकर्‍याने आपले नाव न सांगता सदर युवकांना 200 रुपये बक्षीस दिले.

प्राण वाचवणार्‍या युवकांचे कौतुक 

गुरुवारी सायंकाळी विहिरीत पडलेल्या अल्लाबक्ष पीरजादे याला बाहेर काढण्यासाठी अग्निशमन व पोलिस अधिकार्‍यांनी हायगय केली.पण रवि बदामी, चंदू कोलकार या युवकांनी विहिरीत उतरून त्याला बाहेर काढण्याची कामगिरी बजावली.

मनपाने पादचार्‍यांना जीव गमावण्यासाठी विहीर फुटपाथवर ठेवली आहे का? संबंधित विभागाने याची दखल घेऊन रस्ता रुंदीकरणावेळीच उपाययोजना राबविण्याची गरज होती. मात्र एका व्यक्तीला अपघात घडल्यानंतर प्रशासनाने दखल घेतली आहे. विहिरीचे पुनरुज्जीवन तरी करावे, किंवा कायमस्वरूपी संरक्षण व्यवस्था उभारावी.
- संतोष दरेकर