होमपेज › Belgaon › तब्बल 65 शाळांत पहिलीला प्रवेश शून्य!

तब्बल 65 शाळांत पहिलीला प्रवेश शून्य!

Published On: Jun 07 2018 2:04AM | Last Updated: Jun 07 2018 12:23AMबेळगाव : प्रतिनिधी

राज्यात खासगी शाळेकडे पालकांचा ओढा वाढल्याने सरकारी शाळेत पहिलीच्या वर्गात प्रवेश घेण्यात कमालीची घट झाली आहे. त्यामुळे राज्यातील 261 शाळापैकी 229 शाळांमध्ये पटसंख्या कमी असून यंदा 65 शाळेत पहिलीच्या वर्गात एकाही विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेला नाही.  त्यामुळे 137 शिक्षकांच्या हाताला काम नाही. या शिक्षकावर बदलीची टांगती तलवार आहे. नव्याने होणार्‍या शिक्षक भरतीवरही साशंकतेचे ढग  पसरले आहेत.

सीमाभागात मराठी शाळेबरोबर कन्नड माध्यमांच्या शाळांचेही अस्तित्व धोक्यात आले आहे. पालकवर्गाचा ओढा खासगी शाळांकडे  आहे. त्यामुळे केवळ अंगणवाडी वगळता सरकारी शाळेत पहिलीपासूनच प्रवेश घेण्यास पालक उत्सुक नाहीत. 

यंदा 16 मे पासूनच सरकारी शाळेत प्रवेश घेण्यासाठी शासनाने शाळा प्रवेश अभियान राबविले. त्यासाठी शाळेतील शिक्षक, शाळा सुधारणा समिती, माजी विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले. 
सरकारी शाळेत मातृभाषेतून शिकण्याची संधी असते. त्यामुळे मुलांना विषयाचे आकलन चांगल्याप्रकारे होते. त्याशिवाय मोफत गणवेश, शूज, पाठ्यपुस्तके शाळेतून मिळतात. या मुद्दयांवर शाळा प्रवेश अभियान मोहिम राबविण्यात आली होती. 

सरकारी शाळेतील मुले खासगी शाळेत 

सरकारी शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षकांची मुले खासगी शाळेत शिक्षणाचे धडे गिरवित आहेत. त्यामुळे पहिल्यांदा तुमची मुले सरकारी शाळेत पाठवा त्यानंतर आमच्या मुलांना तुमच्या शाळेत घालतो अशी भूमिका पालकवर्गाने प्रवेश अभियानावेळी घरी आलेल्या शिक्षकांजवळ घेतली होती. त्यानंतर शिक्षकांनी प्रवेश अभियान राबवणे बंद केले आणि ही जबाबदारी शाळा सुधारणा समितीने पार पाडली. पण अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. 

शिक्षक भरतीवर सावट

राज्यात शिक्षक भरतीसाठी सीईटी व टीईटी उत्तीर्ण झाल्यानंतर सरकारी शाळेत सेवा बजावण्याची संधी मिळते. मात्र सहा महिन्यांपूर्वी घेतलेल्या टीईटी व सीईटी उत्तीर्ण उमेदवारांना अजून संधी मिळाली नाही. विद्यार्थी सरकारी शाळेत येत नसतील सध्या सेवेत असलेले शिक्षकच अतिरक्त शिक्षकांच्या यादीत येणार आहेत. त्यामुळे नव्याने शिक्षक भरती होणार की नाही, याकडे बेरोजगार डीएड व बीएड पदवीधर लक्ष ठेऊन आहेत.