Fri, Dec 13, 2019 00:14होमपेज › Belgaon › बाप्पा चालले...

बाप्पा चालले...

Published On: Sep 12 2019 1:47AM | Last Updated: Sep 12 2019 1:47AM
बेळगाव : प्रतिनिधी

गेल्या दहा दिवसांपासून विराजमान झालेल्या लाडक्या बाप्पांना गुरुवारी (दि. 12) जल्लोषपूर्ण वातावरणात निरोप देण्यात येणार आहे. बेळगावची ऐतिहासिक मिरवणूक हुतात्मा चौकातून सायंकाळी 5 वाजता सुरू होणार आहे. महापालिका व पोलिस प्रशासनाने विसर्जनाची जय्यत तयारी केली आहे.

सर्व सार्वजनिक तसेच असंख्य घरगुती गणरायांना गुरुवारी निरोप देण्यात येणार आहे. विसर्जनासाठी महापालिकेने शहराच्या चारीही बाजूंना सात तलाव खुले केले आहेत. कपिलेश्वर तलाव, कपीलतीर्थ तलाव, जुने बेळगाव येथील कल्मेश्वर तलाव, जक्कीनहोंड तलाव, अनगोळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तलाव, किल्ला तलाव, कणबर्गी येथील सिद्धेश्वर तलाव, मजगाव येथील तलावात गणरायाचे विसर्जन करण्यात येणार आहे. 

ढोल-ताशांच्या गजरात विसर्जन मिरवणूक रात्रभर चालणार आहे. त्यासाठी विविध पथकांकडून गेल्या अनेक दिवसांपासून सराव करण्यात येत आहे. मिरवणुकीत मोठ्या आवाजाची साऊंड सिस्टम लावू नये, अन्यथा कारवाई करु, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी व पोलिस आयुक्त बी. एस. लोकेशकुमार यांनी दिला आहे.

कपीलेश्वर व कपीलतीर्थ तलावाजवळ महापालिकेने प्रत्येकी चार अशा आठ क्रेनची सोय केली आहे. अन्यत्र एकेक क्रेन देण्यात आली आहे. धर्मवीर संभाजी चौकात स्वागत कक्ष उभारला असून कॉलेज रोडवर प्रेक्षा गॅलरीची उभारणी केली आहे. विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी शहरासह ग्रामीण भागातील भाविक मोठ्या संख्येने येत असतात. त्यामुळे त्यांच्यासाठी ही गॅलरी उभारण्यात आली आहे. तलावावर सूचना देण्यासाठी कक्षाची स्थापना केली असून परिसरावर सीसीटीव्हीची नजर असणार आहे. महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्यासह पोलिस व इतर विभागाच्या अधिकार्‍यांनी विसर्जन मार्गाची पाहणी केली आहे. रस्त्यातील खड्डे बुजविण्यात आले असून अडथळेही हटविले आहेत. तलावावर स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

बेळगाव, शहापूर, वडगाव आणि अनगोळ भागातील मूर्ती कपिलेश्वर, कपिलतीर्थ व इतर तलावांकडे येणार आहेत. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाने केले आहे.

शेवटच्या दिवशी गर्दीचा महापूर

गणेशोत्सवाच्या सुरवातीच्या आठ दिवसांत पावसाचा अडथळा आल्यामुळे भाविकांना शहरातील गणेश दर्शन घेता आले नाही. देखावे सादरीकरणही झाले नव्हते. पण, दोन दिवसांपासून पावसाने उसंत दिल्यामुळे भाविक गणरायाचे दर्शन घेत आहेत. बुधवारी रात्री उशिरापर्यंत शहरातील रस्त्यांवर गर्दी झाली होती. मोठ्या संख्येने लोक लाडक्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी शहरात फिरत होते. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस बंदोबस्तही चोख ठेवला होता.