Wed, Apr 24, 2019 15:47होमपेज › Belgaon › पोलिसांच्या डोक्यावरच नियमबाह्य हेल्मेट

पोलिसांच्या डोक्यावरच नियमबाह्य हेल्मेट

Published On: Jan 19 2018 1:49AM | Last Updated: Jan 19 2018 12:27AMबेळगाव : प्रतिनिधी 

दुचाकीस्वारांनी हेल्मेट न परिधान केल्याने जीव गमवावा लागल्याच्या घटना वाढल्यानंतर उ.परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक आलोककुमार आणी पोलिस आयुक्त राजप्पा यांनी हेल्मेटसक्ती आणि रहदारी नियमांवर बोट ठेऊन अंमलबजाणी करण्याची घोषणा केली आहे. मात्र, स्वतः पोलिस अधिकारी आणि कर्मचारीच आयएसआय दर्जा नसलेले हेल्मेट वापरतात. इतकेच नव्हे तर दुचाकी चालवत असताना मोबाईलवरही बोलतात. तर पोलिसांच्या चारचाकी वाहनांचे बहुतांशी चालक विनासीटबेल्ट असतात. 

पोलिसांच्या डोक्यावरील हेल्मेट  बंदोबस्तासाठीच्या काळातील असते. त्याचा वापर ते दुचाकी चालवताना करतात. एकतर हे हेल्मेट पुरेसे नाही. शिवाय ते आयएसआय दर्जाचेही नाही. त्यामुळे रहदारी नियमांचा बडगा दाखवणारे पोलिस अधिकारी स्वतःच्या खात्यातील कर्मचाऱयांवर काय कारवाई करणार हा प्रश्न आहे. 

हेल्मेटसक्तीचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने बजावला. हेल्मेट आयएसआय दर्जाचेच हवे, हेही स्पष्ट करण्यात आले होते. त्यानंतर अवजड वाहनातुन धोकादायक प्रवास टाळावा,मद्यप्राशन करुन वाहने हाकू नयेत, सीट बेल्ट वापरावा, याबाबतही सक्त अंमलबजावणी केली जाणार असल्याचे पोलिस प्रशासनाने जाहीर केले आहे. हेल्मेेटसक्ती अंमलबजावणीबाबत रहदारी पोलिसांनी जनजागृती मोहीमही हाती घेतली आहे. मात्र रहदारी पोलिसांच्या हेल्मेट जनजागृती फेरीत दुचाकीवर सहभागी झालेल्या पोलिसांच्या डोक्यावर बंदोबस्ताची हेल्मेट होती.

पोलिसांच्या डोक्यावर दिसणारी हेल्मेट त्यांना बंदोबस्त काळात ईजा होऊ नये यासाठी देण्यात आलेली आहेत. त्या हेल्मेटना आयएसआय दर्जा नाही. मात्र पोलिसच दुचाकीवर वापरत असलेले हेल्मेट नियमबाह्य असल्याची बाब पोलिस आयुक्तांच्या नजरेत अद्यापही आलेली नाही. पोलिस वाहनांवरील बहुसंख्य वाहनचालक सीटबेल्टचा वापरच करत नाहीत. अनेक चालक वाहन चालवीत मोबाईलवर बोलताना दिसतात. त्यामुळे नियमभंग करणार्‍या पोलिसांवरही कारवाई गरजेची आहे.