Sat, Jun 06, 2020 23:03होमपेज › Belgaon › निपाणीत सर्व्हे नं. 157 व 158 मधील प्लॉट धारकांना असेसमेंट उतारे देण्याची टाळाटाळ

निपाणीत सर्व्हे नं. 157 व 158 मधील प्लॉट धारकांना असेसमेंट उतारे देण्याची टाळाटाळ

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

निपाणीतील सर्व्हे क्र. 157 व 158 मधील प्लॉटधारकांना पालिकेकडून असेसमेंट उतारे मिळत नसल्याने सुमारे 20 प्लॉटधारकांनी माहितीच्या अधिकाराखाली याबाबतची माहिती मागविल्याची माहिती संजय सूर्यवंशी, महेश कोळकी, विजय सावंत व एस. व्ही. सुगते यांनी दिली.

1995-96 साली सदर जमीन बसवराज कोठीवाले यांनी एनए लेआऊट केली होती. त्यांच्या निधनानंतर विष्णू बलुगडे व आप्पासाहेब भोसले यांनी प्लॉटधारकांना खरेदीपत्र करून दिले होते. सध्या कोठीवाले यांच्या वारसांकडे या जागेचा एक आणि टाऊन प्लॅनिंग व पालिकेकडे दुसराच ले-आऊट आहे. या जागेतील उद्यानासाठी राखीव जागेतही सुमारे 40 प्लॉट पाडून विकले गेल्याचा संशय आहे. यामुळे पालिकेकडून प्लॉटधारकांना असेसमेंट उतारे दिले जात नाहीत. 

बसवराज कोठीवाले यांनी लॉटरी पद्धतीने हप्त्यावर ही प्लॉट योजना राबविली होती. या जागेला त्यांनी अष्टविनायकनगर असे नावही दिले. सुमारे 306 प्लॉट येथे आहेत. त्यापैकी पालिकेने 84 जणांना असेसमेंट उतारे दिले असल्याची माहिती सूर्यवंशी यांनी दिली. या जागेतच डॉ. आंबेडकर वसती निगम व वाजपेयी नगर वसती योजनेतून पालिकेने काही लाभार्थ्यांना घरे बांधण्याची परवानगी दिली आहे. अनेकांची घरेही येथे आहेत. परंतु नव्याने घरे बांधू इच्छिणार्‍यांना पालिकेचे पदाधिकारी व महसूल खात्याकडून पाने पुसण्याचे काम सुरू आहे. काही प्लॉट धारकांनी सातत्याने असेसमेंट उतार्‍याची मागणी केली आहे. विकासकर भरण्याची तयारी असतानाही उतारे का मिळत नाहीत, याचा जाब माहितीच्या अधिकाराखाली विचारला जाणार आहे. 

पालिकेने खुल्या उद्यानातील प्लॉट पाडून विकणार्‍या मालकांवर कोणती कारवाई केली, कोणत्या नकाशाप्रमाणे असेसमेंट उतारे  कोणाकोणाला दिले, याचा खुलासा यातून होणार आहे. वरील नागरिकांनी 7  फेबु्रवारीला पालिकेला निवेदन देऊनही उपयोग झालेला नाही. 


  •