Thu, Jun 20, 2019 00:31होमपेज › Belgaon › ‘उडाण’मुळे खासगी कंपन्यांचा बेळगावला ठेंगा

‘उडाण’मुळे खासगी कंपन्यांचा बेळगावला ठेंगा

Published On: Jul 28 2018 1:32AM | Last Updated: Jul 28 2018 12:04AMबेळगाव : अंजर अथणीकर

उत्तर कर्नाटक आणि पश्‍चिम महाराष्ट्रासाठी अत्यंत उपयुक्त  आणि सुमारे चारशे कोटी रुपये खर्चून सांबरा विमानतळ अत्याधुनिक केले असतानाही येथील महत्त्वाची विमानसेवा हुबळीला पळवण्यात आल्याने येथील उद्योजकांना फटका बसला आहे. 

या ठिकाणची विमानसेवा बंद करण्यापूर्वी दहा महिन्यात प्रवासी संख्या 7 हजार 400 वरुन 17 हजार 800 वर गेली. पण आता केवळ बंगळूरसाठीच सेवा सुरु ठेवल्याने अश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. हा सर्व प्रकार केवळ हुबळीसाठी ‘उडान योजना’ लागू केल्यामुळे झाला. 

सांबरा विमानतळ कर्नाटकातील सर्वात जुने आणि आता सर्व सोयीनी युक्त आहे. विमानतळ अत्याधुुनिक करण्यासाठी चारशे कोटी खर्च करण्यात आले. आता अगदी आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरु करण्याचीही सोय आहे. यापूर्वी मुंबई, हैदराबाद, चेन्नईसाठीची प्रवासी संख्या 7 हजार 400 वरुन 17 हजार 800 वर गेली होती. तिकिटाचे बुकिंग नेहमी फुल्ल असे. 

विमान प्राधिकरणाकडून ‘ उडाण योजना’ हुबळीसाठी लागू केल्याने तीन ते चार खासगी कंपन्या आता हुबळीकडे वळल्या आहेत. खासगी कंपन्यांना प्रत्येक प्रवासी सीटसाठी अठराशे रुपये अनुदान मिळते. यामुळे खासगी कंपन्यांनी मोर्चा हुबळीकडे वळवला. येथून आता सर्वच महत्त्वाच्या शहरांसाठी सेवा सुरु झाली आहे. बेळगावमध्ये केवळ अलाईन्स एअरची आठवड्यातून तीन वेळा बंगळूरसाठी सेवा सुरु आहे.

महिनाभरापूर्वी एअर इंडियाचे अधिकारी एम. बी. जोशी एका कार्यकमानिमित्त बेळगावला आले असता त्यांनी येथून ऑगस्टमध्येच मोठ्या शहरासाठी एअर इंडियाची सेवा सुरु करण्याचे अश्‍वासन दिले होते मात अद्याप तरी कार्यवाही झालेली नाही.

अनुदानाचा बुस्टर डोस कधी?

‘उडाण’अंतर्गत प्रत्येक प्रवाशामागे अठराशे रुपये अनुदान खासगी कंपन्यांना मिळते. आता ‘ उडाण योजना 3’ं अंतर्गत बेळगावला ऑक्टोबरमध्ये सेवा सुरु होण्याची शक्यता आहे. याला एअरपोर्ट अधिकार्‍यांनीही दुजोरा दिला आहे. आगामी तीन महिन्यात बेळगाव विमानतळ गजबजणार आहे.
(उत्तरार्ध)