Tue, Mar 19, 2019 03:13होमपेज › Belgaon › गतवर्षीपेक्षा यावर्षी अधिक पाणीसाठा

गतवर्षीपेक्षा यावर्षी अधिक पाणीसाठा

Published On: Apr 17 2018 1:54AM | Last Updated: Apr 17 2018 12:07AMबेळगाव : प्रतिनिधी

सध्या उन्हाच्या झळा तीव्र झाल्या असून पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. परंतु, बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणार्‍या राकसकोप आणि हिडकल जलाशयामध्ये गतवर्षीच्या तुलनेत पाण्याची पातळी अधिक असल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. 

सध्या उन्हाची तीव्रता वाढलेली आहे. यामुळे भूजल पातळी झपाट्याने खालावत चालली असून अनेक भागात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. शहराला पाणीपुरवठा करणार्‍या राकसकोप धरणात मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे 7 इंच पाणी साठा अधिक प्रमाणात आहे. यामुळे पाणीटंचाईचे संकट येण्याची शक्यता कमी आहे.

राकसकोप धरणात कमाल पाणीसाठा 2477.4 फूट इतका होता. 15 एप्रिल रोजी 2459.15 फूट इतका पाणी साठा आढळून आला. हा पाणीसाठा मागील वर्षीच्या पाणीसाठ्याच्या तुलनेत 7 इंचाने अधिक आहे. एप्रिल 8 पासून शहराला धरणाच्या तिसर्‍या दरवाजातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. येत्या जून महिन्यापर्यंत पाणीपुरवठा होईल इतका समाधानकारक पाणीसाठा धरणामध्ये उपलब्ध आहे.
मागील वर्षी जून महिन्यातच धरणाने तळ गाठला होता. 

यामुळे पाण्याची समस्या निर्माण झाली होती. यामुळे यावर्षी खबरदारी घेवून धरणाच्या फळ्यावर 9 इंची तांब्याची पट्टी घालण्यात आली. परिणामी धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ झाली. त्यामुळे धरणामध्ये पाणीसाठा वाढला. हा पाणीसाठा सध्या शिल्लक असून नागरिकांची तहान भागवत आहे. 

शहराला हिडकल धरणातूनही मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा करण्यात येतो. याठिकाणी 4 टीएमसीहून अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. 
हिडकल धरणात 12.19 टीएमसी पाणीसाठा होता. हा साठा मागील वर्षाच्या पाणीसाठ्याच्या तुलनेत 8.67 टीएमसी इतका अधिक आहे. धरणात अधिक प्रमाणात पाणीसाठा असल्यामुळे पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता कमी आहे.
राकसकोप धरणाची पाणीसाठा क्षमता 0.6 टीएमसी इतकी आहे. हिडकल धरणातून शहराला 1 टीएमसी पाणी वर्षाला पुरविण्यात येतो. हिडकल धरणात सध्या 8.67 टीएमसी पाणीसाठा शिल्लक असल्याने शहराला यावेळी पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवण्याची शक्यता कमी आहे.

Tags : plenty ,water storage ,this year