Tue, Apr 23, 2019 02:07होमपेज › Belgaon › दिव्यांग उपाशी, धडधाकट तुपाशी 

दिव्यांग उपाशी, धडधाकट तुपाशी 

Published On: Aug 09 2018 1:35AM | Last Updated: Aug 08 2018 10:29PMखानापूर : वार्ताहर

दिव्यांग असल्याचे खोटे प्रमाणपत्र तयार करून दिव्यांगांसाठी असणार्‍या सोयीसुविधांचा फायदा घेणार्‍या पाच जणांविरुध्द खानापूर पोलिसात तालुका आरोग्याधिकार्‍यांनी तक्रार दाखल केली. या प्रकरणात तालुक्यातील काही राजकीय व्यक्तींचाही सहभाग असल्याने या प्रकरणाची जोरदार चर्चा आहे. मंगळवारी अपंग प्रमाणपत्रांची छाणणी करताना हा प्रकार उघडकीस आला. दिव्यांग उपाशी, धडधाकट तुपाशी असा हा सारा मामला आहे.

सुविधा मिळविण्यासाठी शासकीय कार्यालयांच्या खेटा मारणार्‍या  दिव्यांगांना वंचित राहावे लागते तर अशा बनावट दिव्यांगांना तात्काळ सोयीसुविधा मिळतात. 

या प्रकरणी तालुका आरोग्याधिकारी संजय डुमगोळ यांनी पाच जणांविरुध्द  खानापूर पोलिसात फसवणुकीची तक्रार केली आहे. त्यांच्यावर फसवणूक करणे, शासकीय सोयीसुविधांचा अवैध पध्दतीने लाभ घेणे या अंतर्गत गुन्हा नोंद झाला आहे. यात भाजपचे ओबीसी मोर्चाचे प्रधान सचिव आनंद अशोक सुतार (लोंढा), खानापूर प्राथमिक कृषी पत्तीनचे संचालक अशोक बाबाजी पाटील (नागुर्डा), यल्लाप्पा बी. कोळवी (बिडी), गीता मांगीलकर (मणतुर्गा) व चिक्कमुन्नवळी कृषी पत्तीनच्या उपाध्यक्षांची मुलगी सरस्वती पी. बाबरी (चिक्कमुन्नवळी) यांचा समावेश आहे.

गुन्हा नोंद झालेल्यांकडील  प्रमाणपत्रे बनावट असून ती खानापूर आरोग्य खात्याकडून देण्यात आलेली नाहीत. तरीही त्यावर आरोग्य खात्याचा शिक्का, आरोग्याधिकार्‍याची सही आणि तज्ज्ञाची बनावट सही आहे. खात्याने गेल्या वर्षभरात 150 प्रमाणपत्रे वितरित केली आहेत. यातील बनावट प्रमाणपत्रांवर 400 च्या पुढील क्रमांक आहे. याचे गांभीर्य ओळखून डुमगोळ यांनी पोलिसात धाव घेतली आहे.