होमपेज › Belgaon › फोटोग्राफी, एडिटिंगची तरुणाईला भुरळ

फोटोग्राफी, एडिटिंगची तरुणाईला भुरळ

Published On: Dec 15 2017 2:43AM | Last Updated: Dec 15 2017 12:35AM

बुकमार्क करा

बेळगाव : सतीश जाधव

स्मार्टफोन इतके अद्ययावत झालेत की, डिजीटल कॅमेर्‍यासारखे फोटो काढता येतात. यामुळे मोबाईलवर काढलेल्या फोटोचे चांगले एडिटिंग करून प्रसिध्दीसाठी सोशल मीडियाचा आधार घेतला जात आहे. फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅप व इंस्टाग्रामवर चांगले फोटो काढून शेअर करणार्‍यांची संख्या वाढली असून सध्या फोटो एडिटिंगची चलती आहे. फोटो एडिटिंग करून घेण्यासाठी 100 ते 2 हजार रुपयांपर्यंतची मागणी केली जात आहे. यामुळे हादेखील व्यवसाय बनला आहे. 

फोटो काढणे, हावभाव टिपणे, क्षण बंदिस्त करणे इथपर्यंत फोटोग्राफीचे क्षेत्र सीमित नाही. कॅमेरा हाताळणे, एडिटिंग, सॉफ्टवेअरवर विविध फोटोंचे मिक्सिंग करणे, अल्बम बनविणे आणि पॅकेजिंग करून ते ग्राहकांना हवे तसे सजवून देणे ही एक कला व व्यवसाय आहे. 

इंटरनेट, मोबाईल संवादाच्या क्षेत्रात प्रगती होण्याबरोबरच तांत्रिक बाबींमध्ये लक्षणीय बदल झाला. इंटरनेट क्षेत्रात मिनिटा मिनिटाला अपडेट येत आहेत. मोबाईल, स्मार्टफोनवरही नवीन व्हर्जन्स येत आहेत. यातील तंत्रज्ञान आणि इतर फिचर्स अपडेट होताना कॅमेरा तितकासा प्रगत नव्हता. मात्र ही कमतरता दूर होणार असल्याने स्मार्टफोनला ‘ऑल इज वन’ म्हटले जाते. 

शहरीबरोबर ग्रामीण भागातही फोटोग्राफी अन् फोटो एडिटिंगची वाढती क्रेझ आहे. यासाठी मित्र, मैत्रिणींच्या सहभागाने चांगल्या दर्जाचे कॅमेरे खरेदी करणे व फोटोग्राफी करणे हे वेड तरुणाईला लागले आहे. सोशल माध्यमांवर माझा की तुझा फोटो चांगला, अशी स्पर्धा निर्माण झाली आहे. कॅमेरा हातात आल्यानंतर आठवड्यातून किमान दोनदा तरी फोटो शूटचा बेत आखला जातो. 

व्हॉट्स अ‍ॅपवर स्टेटस व डीपीसाठी, इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढविण्यासाठी व फेसबुकवर लाईक व कॉमेंटसाठी कॅमेर्‍यातून फोटो काढून एडिटिंग करून घेतले जातात. या माध्यमांवर शेअर केले जातात. फोटो काढण्यासाठी क्वीन्स गार्डन, शिवाजी उद्यान, राजहंसगड, राकसकोप धरण, बेळगाव-चोर्ला मार्ग आदी ठिकाणे मोहवतात.