बेळगाव : प्रतिनिधी
ग्रा. पं. च्या विकासात अडथळा ठरणारी कर्मचार्यांची वानवा दूर करण्याचा प्रयत्न जि. पं. ने केला आहे. जिल्ह्यात 71 पीडीओ (ग्रामविकास अधिकारी) तर 72 प्रथम श्रेणी सचिवांची नेमणूक झाली आहे. यामुळे ग्रा. पं.ना पुरेसा अधिकारीवर्ग मिळणार आहे.
बेळगाव जिल्हा राज्यातील सर्वाधिक भौगोलिक क्षेत्र असणारा म्हणून ओळखला जातो. परंतु त्या प्रमाणात ग्रा. पं. मध्ये अधिकारी व कर्मचार्यांची संख्या नव्हती. यामुळे याचा परिणाम विकासकामावर होत असे. याबाबत वारंवार तक्रारी दाखल करण्यात येत होत्या. एका पीडीओला दोन ते तीन ग्रा. पं. चा भार सांभाळावा लागत असे. याचा परिणाम ग्रा. पं. च्या कारभारावर होत
असे.
नव्याने पीडीओ आणि प्रथम श्रेणी अधिकार्यांची नेमणूक केल्यामुळे जिल्ह्यातील सुमारे 80 टक्के ग्रा. पं. चा अधिकार्यांचा प्रश्न सुटला आहे.
अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील ग्रा. पं.ना अधिकारी कमतरतेचा सामना करावा लागत असे. ग्रामविकास आणि पंचायतराज खात्याने नुकतीच अधिकार्यांची भरती केली. त्यापैकी 53 पीडीओ हजर झाले आहेत. उर्वरित अधिकारी येत्या दिवसात हजर होणार आहेत.
जिल्ह्यातील 505 ग्रा. पं. पैकी 324 ग्रा. पं. ना पीडीओपद मंजूर आहे.181 ग्रा. पं. चा कारभार प्रथम दर्जाच्या सचिवावर अवलंबून आहे. यापैकी 240 पीडीओ, 109 प्रथम दर्जाचे सचिव याप्रकारे 349 जण कार्यरत आहेत.
जिल्ह्यात 84 पीडीओ आणि 72 प्रथम दर्जाच्या सचिवांच्या मिळून एकूण 156 जागा रिक्त होत्या. नव्याने दाखल झालेल्या अधिकार्यांमुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.