Thu, Jan 30, 2020 00:09होमपेज › Belgaon › आधी वडाप वाहनांना नियम लागू करा

आधी वडाप वाहनांना नियम लागू करा

Published On: May 06 2018 1:07AM | Last Updated: May 06 2018 12:23AMबेळगाव  : प्रतिनिधी

शहरातील रिक्षांना मीटरसक्ती करण्यासाठी पोलिस खात्याने तयारी चालविली आहे. सदर मीटर सक्तीला रिक्षाचालकांनी विरोध दर्शविला नसला तरी शहरातील मॅजिक रिक्षा, वडाप टेम्पो वाहतुकीवरही कारवाई करण्यात यावी. तरच रिक्षाचालकांना मीटर सक्ती परवडणार आहे. याबद्दलही प्रशासनाने विचार करुन रिक्षांना मीटरसक्ती करावी, अशा प्रतिक्रिया अनेक रिक्षाचालकांनी व्यक्त केल्या आहेत. 
शहरातील रिक्षाचालकांकडून ग्राहकांची लूट करण्यात येत आहे. यासंदर्भात पोलिस खात्याकडे अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत. यावरुन पोलिस आयुक्तालयाकडून रिक्षांना मीटरसक्ती करण्याची सूचना करण्यात आली आहे. मात्र रिक्षाचालकांनी प्रशासनाच्या मीटर सक्तीला विरोध दर्शविलेला नाही. मात्र मॅजिक रिक्षा, टमटम, टेम्पोंमुळे रिक्षाचालकांना प्रवासी मिळेनासे झाले आहेत. त्यामुळे रिक्षाचालकांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

यासाठी सदर वाहनांनी नियमानुसार प्रवासी वाहतूक करावी, यासाठी आरटीओंनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.  वडाप वाहनांमुळे रिक्षाचालकांचा व्यवसाय घटला आहे. शहराचा व्याप्ती मोठी नसल्याने रिक्षाचालकांना तासनतास प्रवाशांची वाट पाहत बसण्याची वेळ आली आहे. त्यामुळे वडाप वाहनांना शहरात प्रवासी वाहतुकीवर निर्बंध घालावेत. मगच रिक्षांना मीटर बसविण्यात यावेत.  याबरोबरच रिक्षांसाठी वाढीव भाडे देण्यात यावे, अशी मागणी रिक्षाचालकांकडून करण्यात येत आहे. अनगोळ, वडगाव, शहापूर आदी भागातून येणार्‍या मॅजिक रिक्षा चालकांमुळे प्रवासी  मिळेनासे झाले आहेत. याकडेही प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी रिक्षाचालकांतून करण्यात येत आहे.