Tue, Jul 23, 2019 06:44होमपेज › Belgaon › ‘पीए’राज संपुष्टात, हवे विकासराज

‘पीए’राज संपुष्टात, हवे विकासराज

Published On: Jun 13 2018 1:32AM | Last Updated: Jun 12 2018 10:19PMबेळगाव : प्रतिनिधी

बेळगाव आणि हुक्केरी तालुक्यांतील गावांचा समावेश असणारा संमिश्र मतदारसंघ म्हणून यमकनमर्डी मतदारसंघ ओळखला जातो. आ. सतीश जारकीहोळी मतदारसंघाचे सलग तिसर्‍यांदा नेतृत्व करत असून विकासकामे राबवूनदेखील अनेक अडचणी  ठाण मांडून आहेत.  विकासात अडथळा ठरलेल्या तब्बल 13 स्वीय सहायकांचा (पीए) गराडा आ. जारकीहोळी यांनी हटविल्याने विकासकामांची पहाट होईल अशी अपेक्षा केली जात आहे.

आ. जारकीहोळी राज्यातील प्रभावी राजकारणी म्हणून ओळखले जातात. राज्याच्या राजकारणावर  त्यांचा वचक आहे. त्याचबरोबर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही त्यांनी  काम पाहिले आहे. यामुळे मिळालेल्या संधीचा वापर त्यांनी विकासासाठी पुरेपूर केला आहे. मात्र मतदारांना अनेक समस्या भेडसावत असून त्यावर उपाययोजना करावी लागणार आहे.

यमनकमर्डी मतदारसंघ राखीव असून हुक्केरी तालुक्यातील काही दुर्गम तर बेळगाव तालुक्यातीलदेखील काही दुर्गम गावे यामध्ये समाविष्ट आहेत. त्यामुळे विकासकामे राबविताना कसरत करावी लागत आहे. काही भागातील रस्त्याची कामे पूर्ण झाली आहेत. मात्र दुर्गम भागातील लोकांना अद्याप रस्ते, पाणी, शाळा, वाहतूक या समस्यांचा सामना करावा लागत आहे.

मतदारसंघात मराठी मतदारांची संख्या लक्षणीय आहे. त्यांच्याकडून सातत्याने मराठी कागदपत्रांची मागणी करण्यात येते. मराठी मतदारांच्या मागणीनुसार मराठी कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे.

मतदारसंघातील अनेक गावे दुर्गम आहेत. त्यामुळे मूलभूत सुविधा पुरविण्यावर भर द्यावा लागेल.रखडलेल्या पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यास प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे. 

आ. जारकीहोळी हे विकासकेंद्रीत राजकारणाला प्राधान्य देतात. मात्र त्यानी नेमलेल्या स्वीय सहाय्यकामुळे त्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्याचबरोबर लोकांच्या टीकेचे धनी व्हावे लागत आहे. यामुळे कर्मचार्‍याऐवजी नेते तयार करण्याची कसरत त्यांना करावे लागणार आहे. त्यांनी आपल्या 13 स्वीय सहायकांना हटवले आहे.