Wed, Oct 16, 2019 21:02होमपेज › Belgaon › ...अन्यथा सोमवारी बेळगाव बंद

...अन्यथा सोमवारी बेळगाव बंद

Published On: Dec 23 2017 2:03AM | Last Updated: Dec 23 2017 12:28AM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

एकीकडे शहरात दहशतीचे वातावरण असताना काँग्रेस आणि भाजपमध्ये राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. दंगलीमागील नेत्यांची पोलिसांना माहिती असूनही पोलिस प्रशासन विशिष्ट समाजातील नागरिकांना लक्ष्य करीत आहे. ते थांबवून त्या नेत्यासह मूळ दंगलखोरांवर  कारवाई करावी, अन्यथा ‘सोमवारी बेळगाव बंद’ची हाक देऊ, असा इशारा आज भाजपतर्फे देण्यात आला.

खडक गल्ली दगडफेकीबद्दल निरपराध युवकांना अटक तर  महिलांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ते गुन्हे त्वरीत मागे घेण्यात यावेत, अशी मागणी करत भाजपने आयुक्तालयासमोर धरणे आंदोलन केले. 

उत्तर मतदार संघाचे आमदार फिरोज सेठ यांच्याकडून पोलिसांवर दबाव आणला जात आहे. त्यामुळेच पोलिसांकडून विशिष्ट समाजातील युवकांना लक्ष्य केले जात आहे. पोलिस कारवाईत अडथळा आणल्याप्रक़रणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी भाजपने केली.

पोलिसांचे निःपक्षपाती कामः रेड्डी

पोलिस उपायुक्त अमरनाथ रेड्डी यांनी हे आरोप खोडून काढत आपण कोणत्याच दबावाला बळी न पडता निःपक्षपाती काम करत आहे, असे सांगितले. ते म्हणाले, अटक करण्यात आलेल्यांची सखोल माहिती घेऊनच कारवाई करण्यात आली आहे. या दंगलीप्रकरणी 27 जणांना अटक करण्यात आली असून गुलबर्गा, विजापूर, हिंडलगा या कारागृहामध्ये त्यांना पाठविण्यात आले आहे. मंदिराची तोडफोड केल्याप्रकरणाचा व्हिडीओ आपल्याकडे उपलब्ध असून त्यांचा शोध घेतला जात आहे. सदर भागातील सीसीटीव्ही खासगी व्यक्तीकडून बसविण्यात आले आहेत. त्यांचे भाडे परवडत नसल्याने ते बंद ठेवण्यात आले होते. मात्र या दंगलीची दखल घेऊन त्या ठिकाणी हायमास्ट दिवे व सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. 

आ.संजय पाटील, आ.महांतेश कवटगीमठ, माजी अभय पाटील, किरण जाधव, डॉ. रवि पाटील, राजेंद्र हरकुणी, इराण्णा कडाडी, उज्वला बडवाणाचे आदी भाजप कार्यकर्ते खडक गल्लीतील नागरिक महिला यावेळी उपस्थित होत्या.