Mon, Apr 22, 2019 12:26होमपेज › Belgaon › सीमावासीयांची घुसमट कवितेत उमटावी

सीमावासीयांची घुसमट कवितेत उमटावी

Published On: Mar 22 2018 1:41AM | Last Updated: Mar 21 2018 10:48PMबेळगाव : प्रतिनिधी

बेळगाव शहराची काव्यपरंपरा अतिशय समृद्ध आहे. इंदिरा संताचे बेळगाव अशी साहित्य क्षेत्रात बेळगावची ओळख आहे.  मात्र अलीकडच्या काळात येथील वातावरण झपाट्याने बदलत आहे. भाषेवर आक्रमण होत आहे.  भाषिक गळचेपी वाढत आहे. हा काळ कवी आणि कवितेसाठी पोषक आहे. सीमावासियांची होणारी घुसमट कवितेतून उमटणे आवश्यक आहे, असे मत ज्येष्ठ कवयित्री प्रा. शोभा नाईक यांनी व्यक्त केले.

जागतिक कविता दिनाचे औचित्य साधून दै ‘पुढारी’ कार्यालयात बुधवारी काव्यलेखन आणि सीमाभागातील कविता या विषयावर चर्चासत्र झाले. त्यावेळी प्रा. नाईक बोलत होत्या.

प्रा. नाईक म्हणाल्या, कविता हा सर्वात महत्त्वाचा साहित्यप्रकार आहे. साहित्यातून जगण्याशी निगडीत अनेक प्रवाह प्रकट होत असतात. त्यातून जगण्याचे नवे अन्वयार्थ शोधण्याचे काम होते. भावनांचे कल्लोळ शब्दातून व्यक्त करणारा कोण असेल तर तो कवी. सामान्य माणसांचं प्रातिनिधिक रुप म्हणजे कविता असते. 

प्रा. अशोक अलगोंडी म्हणाले, बेळगावची ओळख इंदिरा संताच्या कवितामुळे मराठी साहित्य प्रांताला झाली. सध्याची नवी पिढीदेखील ताकदीने काव्यलेखन करत आहे. मात्र त्यांच्यामध्ये अभ्यासाची कमतरता जाणवते. यासाठी नव्या कवितांचे व साहित्य प्रकाराचे जाणीवपूर्वक वाचन करावे लागेेल.  त्याचबरोबर स्थानिकांना व्यासपीठ मिळणे अत्यावश्यक आहे.

उर्मिला शहा म्हणाल्या, भाषेचा दर्जा खालावत चालल्याने दर्जेदार साहित्यनिमिर्तीत अडथळे येत आहेत. नव्या पिढीला मातृभाषेतून शिक्षण द्यावे लागणार आहे. 

निळूभाऊ नार्वेकर म्हणाले, कवीने सतत सजग असावे लागते. लहानसहान घटनातून कवितेचे विषय मिळत असतात. त्याच्याकडे साहित्याच्यादृष्टीने पाहिल्यास त्यातून कविता प्रकट होवू शकते.

कवी चंद्रशेखर गायकवाड म्हणाले, कविता स्वतः कवीच्या जीवनाशी प्रामाणिक हवी. भरत गावडे यांनीही कवितेबाबत मनोगत व्यक्त केले. निवासी संपादक गोपाळ गावडा यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, कविता हा साहित्यप्रकार वाचकांना सर्वाधिक भावतो. सीमाभागातील मराठी शाळा बंद होत आहेत. कारवार, हुबळी, धारवाड, विजापूर भागातून मराठी हद्दपार झाली आहे. ही अडचण सर्वदूर पोचावी. आभार व्यवस्थापक बाळासाहेब नागरगोजे यांनी मानले.

मराठी चित्रपटसृष्टीमुळे बेळगावचे नाव बदनाम

मराठी चित्रपटसृष्टीने बेळगाव शहराचे नाव बदनाम केले असल्याचा आरोप चंद्रशेखर गायकवाड यांनी केला. चित्रपटात बेळगावच्या पात्राच्या तोंडात वेडीवाकडे उच्चार असणारी मराठी कोंबण्यात येते. यातून विनोद घडविण्याचा प्रयत्न होतो.  बेळगावच्या मराठी माणसांविषयी महाराष्ट्रातील मराठी माणसांमध्ये गैरसमज निर्माण होत असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

दर्जेदार कवितांचे सादरीकरण

चर्चासत्रानंतर कवींनी कविता सादर केल्या. त्यामध्ये सीमावासियांची होणारी परवड, स्त्री मनाची कुचंबना, सामाजिक विषमता, सामान्य जनतेला भेडसावणार्‍या अडचणींचे चित्रण करण्यात आले होते. शोभा नाईक यांनी ‘मायबोलीचा बंद ऊर’, अशोक अलगोंडी यांनी ‘उद्ध्वस्त’, निळूभाऊ नार्वेकर यांनी ‘यौवन’, उर्मिला शहा यांनी ‘ती’, चंद्रशेखर गायकवाड यांनी ‘अशोकचक्र’, भरत गावडे यांनी‘बेळगाव’ कविता सादर केल्या. 

 

Tags : belgaon, belgaon news, word poetry day, pudhari organise, discussion poetry,