Tue, Apr 23, 2019 23:48होमपेज › Belgaon › पिस्तूल नसल्याने भगवान हत्येला विलंब

पिस्तूल नसल्याने भगवान हत्येला विलंब

Published On: Jul 25 2018 1:37AM | Last Updated: Jul 25 2018 12:42AMबंगळूर : प्रतिनिधी

बेळगावातील एका हॉटेलमध्ये पुरोगामी साहित्यिक के. एस. भगवान यांच्या हत्येचा कट आखण्यात आला. त्यांच्या हत्येसाठी जिवंत काडतुसे उपलब्ध असली तरी पिस्तूल मिळत नसल्याने काही काळ हा कट पुढे ढकलण्यात आली. उप्पारपेठ पोलिसांनी उडपी मॅजिस्ट्रेट न्यायालयाला सादर केलेल्या आरोपपत्रात ही माहिती देण्यात आल्याचे उघड झाले आहे.

750 पानांच्या आरोपपत्रात स्फोटक माहिती आहे. सुजीत, अमोल काळे, अमित दिगवेकर, निहाल ऊर्फ दादा, मनोहर येडवे बेळगावातील एका हॉटेलमध्ये जमले होते. साहित्यिक भगवान वारंवार हिंदू धर्माचा अपमान करत असल्याने त्यांची हत्या करण्याचा निर्णय घेण्यात आला. अनिल नामक युवकाकडून पिस्तूल आणि एअरगन खरेदी करण्यात आले. यासाठी नवीनने पैसे दिले. बेळगावातच त्यांनी पिस्तूल चालविण्याचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर म्हैसुरातील एका हॉटेलमध्ये या सर्वांनी बैठक घेतली. 

हिंदू संघटनेचा कार्यकर्ता असणारा प्रवीण वेगवेगळ्या नावाने ओळखला जात होता. त्याचे मूळ नाव कुणालाच माहीत नव्हते. कोणत्याही संघटनेत कुणीही आपले मूळ नाव नोंद करायचे नाही की एकमेकाला त्या नावाने हाक मारायची नाही, असे त्यांनी ठरविले होते. आपल्यापैकी कुणी पोलिसांना सापडल्यास खरी नावे उघड होऊ नयेत, याची खबरदारी त्यांनी घेतली होती. के. टी. नवीनकुमारच्या अटकेनंतर अमित दिगवेकरने सर्वांशी संपर्क साधून भूमिगत होण्याची सूचना दिली होती. त्यानुसार अमोल काळे अनेक महिने चेहरामोहरा बदलून महाराष्ट्रात वावरत होता. काही महिन्यानंतर दावणगेरी बसस्थानकावर तो पोलिसांना सापडला.

अमित दिगवेकर हा एका संघटनेच्या वृत्तपत्रात मुद्रितशोधक (प्रूफ रिडर) म्हणून काम करत होता. वेळोवेळी तो मठ, मंदिरांना भेटी देत होता. महाराष्ट्र, गोवा येथील धार्मिक कार्यात त्याचा सहभाग होता. कर्नाटकात आल्यानंतर प्रवीण आणि निहाल यांच्याशी मैत्री झाली. प्रवीणमार्फत त्याची नवीनकुमारशी मैत्री झाली. धर्मरक्षणासाठी हाती शस्त्र घेण्याची तयारी केलेल्या नवीनच्या टोळीत तो सामील झाला. तेथे मनोहर येडवेशी त्याची ओळख झाल्याचा उल्‍लेख आरोपपत्रात आहे.

जिवंत काडतुसे

संशयित के. टी. नवीनकुमार ऊर्फ होट्टे मंज्या याच्याकडे दोन जिवंत काडतुसे होती. सुजीत ऊर्फ प्रवीणने ती काडतुसे निहाल ऊर्फ दादाला दाखविली. भविष्यात कुणी धर्मविरोधी वर्तन केले तर त्याची हत्या करण्यास काडतुसे वापरता येत असल्याचे निहालने सांगितले.