Thu, Jun 20, 2019 00:58होमपेज › Belgaon › तुझ्या मोबाईलला नेटवर्क आहे का?

तुझ्या मोबाईलला नेटवर्क आहे का?

Published On: May 16 2018 1:39AM | Last Updated: May 16 2018 12:20AMबेळगाव : प्रतिनिधी 

आरपीडी महाविद्यालयात मतमोजणी सरू होती. यासाठी आरपीडी कॉर्नरवर कार्यकर्त्यांना थांबविण्यात आले होते. निकाल ऐकण्यासाठी आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे फोन सुरु असल्याने नेटवर्क जाम होऊन फोन व इंटरनेट सेवा विस्कळीत झाली होती. यामुळे मतमोजणी केंद्राजवळ आलेल्या कार्यकर्त्यांमधून नाराजीचा सूर होता. 

उमेदवार, कार्यकर्ते, पोलिस या सार्‍यांना निकालाची उत्सुकता होती. यासाठी बरेच जण निकाल ऐकण्यासाठी आरपीडीजवळील मतमोजणी केंद्राजवळ आले होते. निकालाची उत्सुकता त्यांच्यासह त्यांच्या मित्र-मैत्रिणींनाही होती. यासाठी त्यांच्याकडून फोनवर फोन केले जात होते. तसेच प्रत्येक जण इंटरनेटवर निकाल पाहण्यासाठी व्यग्र होता. यासाठी येथील इंटरनेट व फोन सेवा विस्कळीत झाली. 

इतर वेळी 4 जीच्या स्पीडने पळणारे इंटरनेट यावेळी 2 जी च्या स्पीडने पळत होते. यामुळे कार्यकर्त्यांतून निरुत्साह दिसून येत होते. मित्रांना निकालाच्या ठिकाणीचे फोटो टाकण्यासाठी प्रत्येकजण इंटरनेट चालू करत होता. मात्र, 2 जी च्या स्पीडने इंटरनेट सुरु असल्याने कार्यकर्तेही कंटाळले होते. 

उमेदवार निवडून आल्यानंतर अनेकांनी फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅपवर लाईव्ह सोडले होते. मात्र, इंटरनेट सेवेमध्ये व्यत्यय येत असल्याने लाईव्हमध्येही समस्या येत होती. यामुळे अनेकांच्या उत्साहावर विरजण पडले. अनेकांनी गुलालामध्ये रंगलेले फोटो सोशल मीडियावर शेअर केले. मात्र, फोटो अपलोड होण्यासाठी 5 ते 10 मिनिटे लागत होती. यासाठी अनेकांनी इंटरनेट बंद ठेवणेच पसंत केले. 

या ठिकाणी कडाक्याचे ऊन होते. यामुळे मोबाईलच्या टच स्क्रिनवर काहीही दिसत नव्हते. यासाठी प्रत्येकाने मोबाईलची ब्राईटनेस पॉवर वाढविली होती. सततच्या इंटरनेट वापरामुळे अनेकांचे मोबाईल स्वीच ऑफ झाले. मीडिया प्रतिनिधींनाही ही समस्या उद्भवली. 

अनेक जण घरी निकाल मित्रांना निकाल सांगण्यासाठी इतरांचा मोबाईल मागून घेत होते. प्रत्येकाकडून मोबाईल फोनचा वापर केला जात होता. अशाने फोनसेवा विस्कळीत झाली. समोरासमोर असूनही एकमेकांना फोन लागत नव्हता. कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसली. तुझ्या मोबाईलला नेटवर्क आहे का, अशी विचारणा 
एकमेकाकडे केली जात होती.