Thu, Aug 22, 2019 03:50होमपेज › Belgaon › ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ने काय साधले?

‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ने काय साधले?

Published On: Mar 08 2018 12:00AM | Last Updated: Mar 07 2018 10:02PMबेळगाव : प्रतिनिधी 

हेल्मेटसक्तीला दुचाकीस्वारांकडून दाद मिळत नसल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिस प्रशासनाने शहर उपनगरासह जिल्ह्यात ‘नो हेल्मेट नो पेट्रोल’ मोहीम सुरू केली. मोहिमेस अपेक्षित यश मिळालेच नाही. बुधवार 21 फेब्रुवारपासून मोहिमेची अंमलबजावणी सुरू आहे. बुधवार दि. 7 मार्चला पंधरवडा उलटला. मोहिमेतून पोलिस प्रशासनाने पंधरवड्यात काय साधले? मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी प्रशासन हतबल ठरले का? असा सवाल शहरवासीयांतून केला जात आहे. 
उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार धारवाड येथे हेल्मेट सक्तीच्या मोहिमेनंतर बेळगावातही पोलिस आयुक्त डॉ. डी. सी. राजाप्पा यांच्या आदेशानुसार ती सुरू झाली. याला दुचाकीस्वारांकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने काही दिवसात ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ अशी मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला. 

यासाठी मंगळवार दि. 20 फेबु्रवारी रोजी पोलिस उपायुक्त सीमा लाटकर, वाहतूक पोलिस उपायुक्त महानिंग नंदगावी, वाहतूक एसीपी महांतप्पा मुत्तीनमठ यांच्या प्रमुख उपस्थितीत पेट्रोल पंप मालकांची बैठक घेतली. या बैठकीत नो हेल्मेट नो पेट्रोल मोहीम जाहीर केली. यासाठी दि. 21 फेबु्र. पासून शहरातील काही पंपांवर 1 पोलिस कॉन्स्टेबल दिला. मात्र केवळ चार दिवसातच बंदोबस्त हटविल्याने पेट्रोल पंप व्यवस्थापकानीही सक्‍तीकडे दुर्लक्ष केले. दारात आलेले ग्राहक  का सोडावेत, अशा मानसिकतेत पंप व्यवस्थापन आहे. 
पोलिस प्रशासनाने पंप प्रशासनाला ठणकावून सांगितले आहे की, बंदोबस्त हटविला तरी पंपावर असणार्‍या सीसीटीव्हीचा आधार घेऊन विनाहेल्मेट दुचाकीस्वारांना पेट्रोल दिल्यास व्यवस्थापनासह दुचाकीस्वारांवर कडक कारवाई केली जाईल. मात्र पंधरा दिवसात अशा कारवाईबाबत काहीच झाले नाही. यामुळे पंप प्रशासनाने व दुचाकीस्वारांनी मोहिमेस हरताळ फासला आहे. 

पहिल्या दोन-तीन दिवसात पोलिस आयुक्त डॉ. डी. सी. राजाप्पा यांनी काही पंपांवर जाऊन पाहणी केली. मात्र त्यांनी कारवाईबाबत दिलेला इशारा हवेतच विरला आहे. वाहतूक पोलिसही आपल्या सवडीप्रमाणे कारवाई करत आहेत. यामुळे विनाहेल्मेट दुचाकीस्वार मोकाट आहेत. शहरातून बाहेर जाणार्‍या काही मार्गावर वाहतूक पोलिसांचे पथक कधी-कधी कारवाई करत आहे. या कारवाईत सातत्य हवे. कारवाईत सातत्य नसल्याने विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर जरब बसेल. मात्र नव्याचे नऊ दिवस होऊ नयेत.