Tue, Jul 23, 2019 10:29होमपेज › Belgaon › जिल्ह्यात वाहतूकदारांचा बंद फोल

जिल्ह्यात वाहतूकदारांचा बंद फोल

Published On: Aug 08 2018 1:47AM | Last Updated: Aug 08 2018 1:47AMबेळगाव : प्रतिनिधी

मोटार वाहन दुरुस्ती विधेयक मागे घेण्याच्या मागणीसाठी मंगळवारी केंद्र सरकारी कर्मचारी संघटनांनी राष्ट्रव्यापी बंद पुकारला होता. त्याला बेळगाव जिल्ह्यात अत्यल्प प्रतिसाद लाभला. अपवाद वगळता जिल्ह्यातील वाहने सुरळीत धावत होती. शहरात बंदच्या आवाहनाला प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे बंदचा कोणताही परिणाम झाल्याचे दिसून आले नाही. उलट, भाजी मार्केट परिसरात वाहनांची काही काळ कोंडी झाली होती.

केंद्राने मोटर वाहन दुरुस्ती विधेयक पारित केले आहे. याचा फटका वाहनधारकांना बसणार आहे. हे विधेयक चालक आणि जनतेविरोधी असून ते त्वरित मागे घेण्याची मागणी वाहतूक संघटनांनी केली आहे. या मागणीसाठी मंगळवारी बंद पुकारण्यात आला होता. 

बंदला रस्ते वाहतूक क्षेत्रातील कर्मचारी आणि मालक संघटनेने पाठिंबा दिला होता. यामध्ये केएसआरटीसी कर्मचारी संघटना, ओटीयू चालक आणि मालक संघ, एआरडीयू संघ, एअरपोर्ट टॅक्सी चालक संघ, पीस ऑटो, केएसआरटीसी/एसटी कर्मचारी संघाटना सहभागी होणार होत्या.

दरम्यान, बंदमध्ये सहभागी होणार्‍या कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याचा इशारा केएसआरटीसीने दिला होता. यामुळे अन्य संघटना बंदमध्ये सहभागी झाल्या नाहीत. 

रिक्षा वाहतुकीसह वडाप वाहतूकदेखील सुरळीत होती. शहरात बंदला प्रतिसाद मिळू शकला नाही. काही संघटनांनी केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध करत जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले.