होमपेज › Belgaon › स्थानिक स्वराज्य निवडणुकीत काँग्रेसशी आघाडी नाही : देवेगौडा

स्थानिक स्वराज्य निवडणुकीत काँग्रेसशी आघाडी नाही : देवेगौडा

Published On: Jul 16 2018 1:24AM | Last Updated: Jul 16 2018 1:24AMबेळगाव : प्रतिनिधी

बेळगावमध्ये ‘निजद’ची पीछेहाट झाली असून सध्याची पक्ष समिती बरखास्त करून नव्याने संघटना बांधणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ‘निजद’ काँग्रेसशी आघाडी करणार नाही. लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी प्राथमिक चर्चा झाली आहे, अशी माहिती माजी पंतप्रधान तथा ‘निजद’चे सर्वेसर्वा एच. डी. देवेगौडा यांनी येथे रविवारी पत्रकार परिषदेत दिली.

‘निजद’ प्रादेशिक, तर काँग्रेस राष्ट्रीय पक्ष आहे. दोघांची विचारसरणी वेगळी आहे. अर्थसंकल्पात उत्तर कर्नाटकवर अन्याय झाला हे मान्य नाही, असे मत देवेगौडा यांनी व्यक्‍त केले.

ते म्हणाले, राज्यात काँग्रेस-निजद आघाडी सरकार असून शेतकर्‍यांच्या कृषी कर्जमाफीची पूर्तता केली आहे. मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी दिवसातील 18 तास सरकार चालविण्यासाठी वेळ देत आहेत. शेतकर्‍यांबरोबर मासेमारी, कोळी, स्त्री शक्‍ती संघटना  व विणकर समाजाचीही कर्जे माफ झाली तर मला आनंद होईल. राज्यात ज्या ठिकाणी ‘निजद’ची पीछेहाट झाली,  त्या भागात जुनी कार्यकारिणी बरखास्त करुन नवीन निवड करणार आहे. बेळगावातदेखील पक्षाची पीछेहाट झाली असून नव्याने कार्यकारणी निवडून पक्ष बळकटीवर जोर देणार आहे. किनारपट्टी भागातील नागरिकांनी ‘आमचा मुख्यमंत्री नव्हे’ अशा आशयाचे फलक लावले. 

त्याबाबतचे दु:ख मुख्यमंत्र्याना आहे. महिला, अंगविकलांग, वृध्द महिलांकरिता योजना राबविण्याचा प्रयत्न सुरु आहे. राज्यात आघाडी सरकार असल्याने मनात असूनदेखील त्या अमलात आणू शकणार नाही.लोकसभा निवडणुकीत आघाडी झाल्यास ‘निजद’ला 10 जागा द्याव्या लागतील, हे माजी मुख्यमंत्री वीराप्पा मोईली यांचे   वैयक्तिक मत आहे, असे देवेगौडा म्हणाले.