Thu, Sep 20, 2018 00:56



होमपेज › Belgaon › कागल पंचायत समिती विस्तार अधिकाऱ्याची बॅग लंपास

कागल पंचायत समिती विस्तार अधिकाऱ्याची बॅग लंपास

Published On: Jan 20 2018 4:10PM | Last Updated: Jan 20 2018 4:10PM



निपाणी : प्रतिनिधी

कागल पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी आर. एस. गावडे यांची बॅग अज्ञातांनी हातोहात लांबविल्याची घटना शनिवारी सकाळी 10 च्या सुमारास नगरपालिकेसमोर घडली. या बॅगेमध्ये 41 हजार रूपये, कागदपत्रे, चेक बुक, ए.टी.एम कार्डे, एलआयसीचे 8 ते 10 बाँड यांचा समावेश होता. महिन्यात सलग तिसर्‍यांदा या प्रकारची चोरी झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

मुळचे खडकलाट येथील गावडे हे सध्या क. सांगाव (ता.कागल) येथे राहिवाशी आहेत. शनिवारी ते कागल तालुक्यातील शाळा तपासणी कामासाठी निपाणीमार्गे जात होते. यावेळी करड्याळ शाळेचे शिक्षक सुरेश खोत यांच्या कारमधून ते कागदपत्रांची झेरॉक्स घेण्यासाठी नगरपालिकेसमोरील एका झेरॉक्स सेंटरवर गेले. 

यावेळी खोत यांच्या कारचे चाक पंक्‍चर झाल्याने ते नगरपालिकेसमोरील पंक्‍चर सेंटरवर कार घेऊन गेले. ते चालकाकडील बाजूचा दरवाजा उघडून बोलत होते. याच दरम्यान काम आटोपून गावडेही कारजवळ आले. खोत आपली कार लावत असताना मागील सीटवर ठेवलेली बॅग नसल्याचे गावडे यांच्या लक्षात आले. त्यानुसार त्यांनी परिसरात याची चाचपणी केली. शिवाय शहर पोलिसांत तक्रार दिली. हवालदार संतोषकुमार हिरेमठ यांनी नगरपालिकेने लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. पण या ठिकाणच्या फुटेजवरही चोरटा दिसून आला नाही.