Mon, Jun 17, 2019 02:14होमपेज › Belgaon › अपघातात बालिका जागीच ठार

अपघातात बालिका जागीच ठार

Published On: Sep 03 2018 1:38AM | Last Updated: Sep 03 2018 12:06AMनिपाणी/अकोळ : प्रतिनिधी

निपाणी-अकोळ मार्गावर आंबा बसस्टॉपवर थांबलेल्या बसला दुचाकीची धडक बसून झालेल्या अपघातात नात ठार तर तिचे आजी- आजोबा जखमी झालेे. रविवारी दुपारी 3.30 च्या सुमारास ही दुर्घटना घडली. सानिका जितेंद्र कुरणे (वय 5, रा.नवे ममदापूर) असे मृत झालेल्या बालिकेचे नाव आहे. बाबुराव तुकाराम कुरणे (वय 55) व कल्पना बाबुराव कुरणे (वय 50) हे जखमी झाले.  

नवे ममदापूर येथील बाबुराव कुरणे हे पत्नी कल्पना व नात सानिका यांना घेऊन निपाणीयेथील रुग्णालयात नातेवाईकाला पाहून दुचाकीवरून गावाकडे परतत होते. दुचाकी निपाणी- अकोळ मार्गावरील पांगिरे (ए) वळणावरील आंबा स्टॉपवर आली. याचवेळी निपाणी-हुन्नरगी ही बस प्रवासी उतरण्यासाठी थांबली होती. दरम्यान, मागून येणार्‍या कुरणे यांच्या दुचाकीची बसला जोरात धडक बसली. दुचाकीवर पुढे बसलेली सानिका बाहेर फेकली गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. बाबुराव यांना गंभीर तर कल्पना यांना किरकोळ दुखापत झाली. जखमी दोघांनाही तातडीने रुग्णवाहिकेतून निपाणीतील म. गांधी रुग्णालयात हलविले. येथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील   

उपचारासाठी कोल्हापूरला हलविले.

घटनास्थळी निपाणी ग्रामीण पो.ठाण्याचे हवालदार के. डी. पाटील, निपाणी आगाराचे वाहतूक नियंत्रक आर. बी. तेजण्णावर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
कुरणे कुटूंबियांची परिस्थिती हलाखीची असून गेल्याच महिन्यात जखमी बाबुराव यांच्या मुलाचा अपघाती मृत्यू झाला आहे.