होमपेज › Belgaon › माहेरची आव्हाने वहिनी पेलणार का?

माहेरची आव्हाने वहिनी पेलणार का?

Published On: Jun 12 2018 12:51AM | Last Updated: Jun 11 2018 11:05PMनिपाणी : राजेश शेडगे

राज्यातील क्रमांक एकचा मतदारसंघ असणार्‍या निपाणीचे सलग दुसर्‍यांदा प्रतिनिधित्व करण्याची संधी आ. शशिकला जोल्ले यांना मिळाली आहे. माहेरची माणसं हे माझे कुटुंब आहे. निपाणी तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मतदारांनी पुन्हा संधी देण्याचे आवाहन आ. जोल्ले यांनी केले होते. काँग्रेसच्या काकासाहेब पाटील यांचा सलग दोनवेळा पराभव करून आ. जोल्ले विजयी झाल्या आहेत. त्यांच्यासमोर मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचे आव्हान आहे.

एका बाजूला काँग्रेसच्या सर्व शक्‍ती एकवटल्या होत्या. माजी आ. सुभाष जोशी यांनीही विरोध दर्शवून काँग्रेस उमेदवाराला साथ दिली. या विरेाधकांच्या टीकाटिपणीला उत्‍तरे न देता मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करू, विकासासाठी पुन्हा आपणास संधी देण्याचे आवाहन करून आ. जोल्ले विजयी झाल्या आहेत. बेरोजगारांच्या हातांना काम देणे, उद्योगधंद्याची निर्मिती करणेे, महिला सबलीकरण, त्यांना स्वयंरोजगाराच्या संधी देणे, निपाणीसह मतदारसंघातील 56 खेड्यांत पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठीच्या पाण्याचा प्रश्‍न सोडविणे आदी आव्हाने पेलावे लागणार आहेत. 

निपाणी नवा तालुका अस्तित्वात आला आहे. पाच वर्षात विविध विकासकामे आणि तालुका प्रश्‍नांवरून श्रेयवादाचे राजकारण रंगले हेाते. आता आ. जोल्ले यांना मागील वेळी केलेल्या 753 कोटींच्या विकासकामांपेक्षा अधिक कामे राबवावी लागणार आहेत. विकासकामांच्या जोरावरच प्रचार करून निवडून आल्याने त्यांना यावर भर द्यावा लागणार आहे. विरोधकांनी माहेरवाशिणीला सासरी पाठवा, असा प्रचार केला होता. आ. जोल्लेंनी माहेरच्या माणसांचा सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी असल्याचे प्रत्युत्तर दिले होते. 

बेळगावनंतर दुसर्‍या क्रमांकाचे शहर म्हणून निपाणीकडे पाहिले जाते. महाराष्ट्र-कर्नाटकाच्या सीमेवरील कोकणचे प्रवेशद्वार असणार्‍या निपाणीत अनेक समस्या आहेत. त्या शासकीय निधी आणि अनुदान आणून त्यांना सोडवाव्या लागणार आहेत. काळम्मावाडी धरणातून जादा दोन टीएमसी पाणी आणण्यासाठी प्रयत्न्ाांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. वेदगंगा व दूधगंगा नदीकाठ सोडला तर अन्य खेडी व डोंगराळ भागातील शेती समृद्ध करण्यासाठी शेती पाण्याच्या शाश्‍वत पाणी योजना राबविणे गरजेचे आहे. 

आ. जोल्ले पुन्हा निवडून आल्याने मतदारसंघातील नागरिकांना सांस्कृतिक पर्वणी लाभणार आहे. प्रेरणा उत्सवासह विविध क्रीडा स्पर्धा, इव्हेंटचे आयोजन करून त्यांनी यापूर्वी नागरिकांचे लक्ष वेधले होते. तसे उपक्रम सातत्याने घ्यावे लागणार आहेत. विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन, तंबाखू मुक्‍तीसाठी प्रयत्न करून पर्यायी पीक घेण्यासाठी शेतकर्‍यांचे प्रबोधन करावे लागणार आहे. निसर्गाचा लहरीपणा असल्याने शेतकरी कसा समृद्ध होईल, याकडे लक्ष द्यावे लागणार आहे. शेतकरी, कष्टकर्‍यांच्या विकासासाठी शासनाच्या योजना राबवाव्या लागतील.  आ. जोल्लेंना निवडून देताना निपाणी मतदारसंघात शांतता व सुव्यवस्था राहील, अशी मतदारांची अपेक्षा आहे. ती सत्यात उतरवण्याचे आव्हानही त्यांच्यासमोर आहे.