Tue, Mar 19, 2019 15:54होमपेज › Belgaon › शववाहिका आधुनिक, पण अ‍ॅम्ब्युलन्स नाही

शववाहिका आधुनिक, पण अ‍ॅम्ब्युलन्स नाही

Published On: Dec 15 2017 2:43AM | Last Updated: Dec 15 2017 12:42AM

बुकमार्क करा

निपाणी : मधुकर पाटील

निपाणी नगरपालिकेने आधुनिक पध्दतीची 17 लाख रु. ची शववाहिका खरेदी केली आहे. ही बाब निपाणीच्यादृष्टीने निश्‍चितच भूषणावह आहे. असे असले तरी आज शहराला अ‍ॅम्ब्युलन्सची पण तितकीच गरज  आहे.  त्यामुळे पालिकेने आता तातडीने अ‍ॅम्ब्युलन्स उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांतून जोर धरू लागली आहे. शहराची वाढती गरज लक्षात घेता चार वर्षापूर्वी न.पा.ने साध्या स्वरूपात शववाहिका म्हणून वैंकुठ रथ कार्यरत केला. मात्र आता पालिकेने सुसज्ज शववाहिकेची सोय केली आहे. शिवाय हे वाहन वातानुकूलित  नाही.

निपाणी शहर सीमावर्ती असल्याने दिवसाआड येथील सरकारी म.गांधी रुग्णालयातील शवागृहात एखादे दुसरे शवविच्छेदन होते. वाढती उपनगरे व शहराला लागूनच महामार्ग असल्याने गंभीर वा किरकोळ अपघाताच्या घटना या नित्याच्याच आहेत. अशावेळी शहरात कार्यरत असलेल्या 108 रुग्णवाहिका वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. मात्र या रुग्णवाहिकेत मृत व्यक्तीला घेण्याची परवानगी नाही. त्यामुळे बर्‍याचवेळेला  संबंधितांच्या नातेवाईकांना खासगी वाहनाचा आधार घ्यावा लागतो.

आजमितीस निपाणीत 108 वाहन सोडून खासगी तत्वावरील एक अ‍ॅम्ब्युलन्स कार्यरत आहे. पण अनेकदा या वाहनावरही ताण पडत होता. त्यामुळे अनेकांना कोल्हापूर, कागल वा इतर ठिकाणी असलेल्या अ‍ॅम्ब्युलन्स वाहनाचा आधार घ्यावा लागत आहे.

पालिकेने दोन दिवसांपूर्वी शहरात शववाहिका कार्यरत केल्यानंतर नागरिकांतून शववाहिकेबरोबरच शहराला अ‍ॅम्ब्युलन्सची गरज होती.अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर देत खर्‍या गरजेकडे लक्ष वेधले. पालिकेने दूरदृष्टी ठेवून गरज असलेल्या शववाहिकेची उपलब्धता शहराला करून दिली आहे. या मागणीबरोबरच आता अ‍ॅम्ब्युलन्सही लवकरात लवकर कार्यरत करावी. यासाठी सभागृहाने तसा ठराव मांडून त्याला मंजुरी मिळवावी, अशी मागणी होत आहे.