Sun, Jul 21, 2019 08:08होमपेज › Belgaon › निपाणीत घरफोड्यांचे सत्र थांबता थांबेना...

निपाणीत घरफोड्यांचे सत्र थांबता थांबेना...

Published On: Dec 06 2017 1:46AM | Last Updated: Dec 05 2017 9:59PM

बुकमार्क करा

निपाणी : राजेश शेडगे 

निपाणी शहर व उपनगरातील चोर्‍या आणि घरफोड्या थांबण्याचे चिन्ह दिसेना. शहराची सुरक्षा रामभरोसे झाली असून नागरिक भयभीत झाले आहेत. पोलिसांनी रात्रीची गस्त कडक करावी, अशी मागणी होतआहे. माजी नगराध्यक्ष अच्युत माने, नयनतारा नलवडे, सेवानिवृत्त पोलिस अधिकारी सुरेश वालीशेट्टी, जिल्हा शिवसेना प्रमुख बाबासाहेब खांबे यांच्यासह सुमारे 35 हून अधिक घरे या दोन-तीन महिन्यात फोडून चोरट्यांनी चांदी करून घेतली. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून घर बंद करून बाहेरगावी जाणे लोकांना मुश्कील झाले आहे. शहरात एकूण तीन पोलिस ठाणी आणि सीपीआय कार्यालय कार्यरत असताना चोरट्यांवर वचक ठेवण्यात पोलिसांना अपयश आले आहे. आ. शशिकला जोल्ले यांनी पोलिस अधिकार्‍यांची बैठक घेऊन वाढत्या चोर्‍यांना पायबंद घाला, अशा सूचना केल्यावरही दोन ठिकाणी चोर्‍या झाल्या. कुलूपबंद घरेच चोरट्यांनी टार्गेट केली आहेत.

खांबे यांचे घर तर पोलिस स्टेशनशेजारीच आहे तरीदेखील हे घर चोरट्यांनी लक्ष्य केले, याला काय म्हणायचे, अशी परिस्थिती आहे. एक-दोन दिवसांची सुटी मिळाली की, नोकरदार मंडळी बाहेरगावी जातात. अशा बंद घराची रेकी करून चोरटे घर फोडत  असल्याचे निदर्शनास येत आहे. गर्दीच्या ठिकाणी पाकिटमारी वाढली आहे. एका राजकीय पक्षाच्या परिवर्तन रॅलीत कांही कार्यकर्त्यांची पाकिटमारी झाली तर काहींचे किमती मोबाईल लांबवल्याच्या घटना घडल्या होत्या. आठवडी बाजारात मोबाईल व पर्स मारण्याचे प्रकारही सुरूच आहेत. दारात लावलेल्या दुचाकी लांबवण्याचे प्रकार घडत असल्याने नागरिकांना भय वाटू लागले आहे. उपनगरांबरोबर अकोळसह ग्रामीण भागातही चोर्‍या होऊ लागल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. भरवस्तीतील घरांबरोबर उपनगरातील घरे चोरट्यांनी लक्ष्य केले आहेत.

शहरातील बिरदेवनगर, लेटेक्स कॉलनी, अकोळ रोड, प्रतिभानगर, दिवेकर कॉलनी हे चोरट्यांनी लक्ष्य केले आहे. अंगावर घाण पडली असे सांगून दिशाभूल करून नगरसेवक नितीन साळुंखे यांची पिग्मी कलेक्शन केलेली बॅग लांबवल्याची घटनाही घडली आहे. शहरात तीन पोलिस ठाणी असली तरी पोलिसांची संख्या तोकडी आहे. त्यांनादेखील मर्यादा आहेत. त्यामुळे नागरिकांनीच सतर्क राहणे गरजेचे आहे. आवश्यक असेल तरच गावी जा. जाताना शेजार्‍यांना सांगून किंवा घरामध्ये कोणाला तरी ठेवून जाण्याची व्यवस्था करा. किमती वस्तू व अधिकचा पैसा घरात ठेवू नका अशा गोष्टींची सतर्कता बाळगणे आवश्यक बनले आहे.