Sat, Jul 20, 2019 13:17होमपेज › Belgaon › निपाणी मतदारसंघात वादळापूर्वीची शांतता

निपाणी मतदारसंघात वादळापूर्वीची शांतता

Published On: Dec 07 2017 1:33AM | Last Updated: Dec 06 2017 9:51PM

बुकमार्क करा

निपाणी : राजेश शेडगे

निपाणी विधानसभा मतदारसंघात सध्या वादळापूर्वीची शांतता असली तरी एप्रिल-मे 2018 मध्ये होणार्‍या निवडणुकीची चर्चा शहर, ग्रामीण भागात सुरू आहे. आ. शशिकला जोल्ले यांनी विविध कामांच्या निमित्ताने प्रचाराचा धडाका लावला आहे. काँग्रेसने शह-काटशह चालविला असून पक्ष भक्कम करण्यासाठी युवा नेते राजेश कदम यांना शहर काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी दिली.
 माजी आ. काकासाहेब पाटील यांनी मोर्चेबांधणी चालविली असून युवा नेते उत्तम पाटील यांनी अरिहंत संस्थेच्या शाखा मतदारसंघाच्या विविध भागात सुरू करण्याचा धडाका लावला आहे. यामुळे पक्षाची उमेदवारी कोणाला, याविषयी अजूनही संभ्रमावस्था आहे. भाजपची बाजू भक्कम दिसत असली तरी निपाणीचे नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर यांनी  आ. जोल्लेंवर टीकाटिपणी  चालूच ठेवली आहे. याला आ. जोल्ले यांनी उत्तरे दिलेली नाहीत, हे विशेष म्हणावे लागेल. 

घरोघरी काँग्रेस हा प्रचारही सुरू आहे. सध्या निपाणी भागातील नागरिकांना विकास हवा आहे. रिकाम्या हातांना काम हवे आहे. यामुळे आरोप करणार्‍यांनी आपण कोणता विकास करतो आहोत, हे जनतेसमोर आणणे गरजेचे आहे. केवळ विरोधासाठी विरोध न करता आणि होणार्‍या विकासकामांना खो न घालता कामांना प्राधान्य दिले पाहिजे, असे म्हणणारा वर्ग  आहे.  अलीकडच्या काळात पारंपरिक राजकारण बाजूला पडले आहे. राजकीय वास्तव बदलत असते. याला स्थानिक आणि देशपातळीवरील घडामोडी कारणीभूत असतात. या बदलाकडे लोकांचे कायम लक्ष असते. ही जागरूकता वाढल्याने निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.

हालशुगरचे चेअरमन आणि माजी आ. सुभाष जोशी यांनी उसाला 3151 इतका उच्चांकी दर दिल्याने त्यांचा ठिकठिकाणी सत्कार होत आहे. या सत्कारादरम्यान जोशींनी संक्रांतीला आपली भूमिका जाहीर करू, असे वक्तव्य केल्याने पुन्हा नागरिकांचे डोळे विस्फारले आहेत. जोल्लेंशी फारकत घेतल्यापासून सुभाष जोशी अनेक कार्यक्रमात काँग्रेस नेत्यांसमवेत दिसून आले आहेत. निपाणीचा काँग्रेसचा उमेदवार हा चिकोडी-सदलग्यातील भाजपचे उमेदवार कोण यावर तर  ठरणार नाही ना, अशीही चर्चा  आहे.