निपाणी : राजेश शेडगे
येत्या 31 ऑगस्ट रोजी होणार्या निपाणी नगरपालिका निवडणुकीसाठी 31 जागांसाठी 159 अर्ज आले आहेत. सोमवारी अर्जांची छाननी होणार असून गुरूवार 23 रोजी अर्ज माघारीची मुदत आहे. निपाणी नगरपालिकेला ऐतिहासिक परंपरा आहे. शतकोत्तर अमृतमहोत्सवाकडे वाटचाल करणार्या या पालिकेची स्थापना कशी झाली, याचा थोडक्यात आढावा...
निपाणीसह परिसरातील गावे ही 1771 साली पेशव्यांकडून सिद्धोजीराव नाईक निंबाळकर यांना सनद मिळाली होती. पूर्वीच्या काळी पट्टणकुडी वेशीपासून महालक्ष्मी मंदिर, मारूतीच्या देवळापयर्ंंत दोन तीन गल्ल्यांचे हे गाव होते. त्याकाळात देशी पद्धतीने साखर तयार करणार्या भट्ट्या मारूती देवालयाजवळ होत्या. म्हणून या वाडीला साखरवाडी असे संबोधले जाते. निपाणीच्या सुरक्षेसाठी सिद्धोजीराजेंनी ऐतिहासिक भुईकोट किल्ला सभोवती खंदक व तटबंदीसह बांधला. परिसरातील गावातून कर्तबगार कुटुंबे बोलावून निपाणीत वसाहत वसविली. त्यात बारा बलुतेदारांचा समावेश होता.
अनेक खेड्यांच्या मध्यभागी हे गाव असल्याने हळूहळू याचे शहरात रूपांतर झाले. पूर्वी निपाणी भागात पावसाचे प्रमाण अधिक होते. गुळ, मिरची, भुईमूग, कापूस व कांदा तसेच नाना प्रकारचे लाकूड, तांदूळ, नारळ व खोबर्याची ही बाजारपेठ होती.
स्थानिक स्वराज्य संस्था
सन 1818 साली पेशवाईचा अंमल नष्ट झाल्यावर मुंबई राज्यात जिल्हावार कलेक्टर हुकूमत निर्माण करण्यात आली. लोकांच्या आर्थिक मदतीने गाव सुधारणा करण्यासाठी नगरपालिकेचा जन्म झाला. सरंजामशाहीमुळे निपाणीस महत्त्व होते. ही सत्ता इंग्रजांनी ताब्यात घेतल्यावर 1830 साली हा भाग बेळगाव कलेक्टरांच्या अंमलाखाली ठेवला. 1850 याली कंपनी सरकारने गाव सुधारणा कायदा केला. 1 सप्टेंबर 1854 साली निपाणीत स्थानिक स्वराज्य संस्थेची सुरूवात झाल्याची नोंद आहे.
1919 साली महालिंगाप्पा कोठीवाले हे पहिले लोकनियुक्त अध्यक्ष म्हणून निवडले गेले होते. 1922 ते 1937 पर्यंत त्रैवार्षिक निवडणुका होत होत्या. 30 एप्रिल 1940 रोजी म्युनिसिपलची पुनर्घटना करण्यात आली. 1943 साली म्युनिसिपल करण्यास मान्यता मिळाल्यावर 1946 च्या निवडणुकीत पालिकेवरील सदस्यसंख्या 21 करण्यात आली. त्यामध्ये 3 मुस्लीम, 2 हरिजन व 1 महिला सदस्य अशा जागा राखीव होत्या.
जकात व घरफाळ्यातून उत्पन्न
1920-21 साली पालिकेचे वार्षिक उत्पन्न 51 हजार 45 रूपये होते. जकात व घरफाळा याच उत्पन्नाच्या मुख्य बाबी होत्या. पालिकेने त्या काळी उत्पन्न वाढविण्यासाठी टोल, व्हीलकर, सर्व्हिसकर, मोटार कर, स्वच्छता कर, करमणूक कर, रॉकेल विक्री परवाना शुल्क, सराफ कर, दिवाबत्ती कर बसविले होते. त्यामध्ये वेळोवेळी फेरफार करण्यात आला.