Tue, Jul 23, 2019 01:54होमपेज › Belgaon › सुसंवादातून पुढील वाटचाल करणार

सुसंवादातून पुढील वाटचाल करणार

Published On: Mar 04 2018 1:45AM | Last Updated: Mar 03 2018 11:43PMबेळगाव : प्रतिनिधी

अनेक कामांची योग्यप्रकारे अंमलबजावणी होत नाही. सुसंवादाअभावी कामकाजात अडथळे निर्माण होतात. याची दक्षता घेत अधिकाराचा योग्य वापर आणि सुसंवादातून पुढील वाटचाल करण्याची ग्वाही नवनिर्वाचित उपमहापौर मधुश्री पुजारी यांनी दिली. शनिवारी सकाळी दै. ‘पुढारी’ कार्यालयास सदिच्छा भेट दिल्यानंतर त्या बोलत होत्या.

उपमहापौर मधुश्री पुजारी यांनी पुढारीकार पद्मश्री ग. गो. जाधव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर ‘पुढारी’ कार्यालयाच्या वतीने पुजारी यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.

उपमहापौर पुजारी म्हणाल्या, मराठी अस्मिता जपण्याचे काम दै. ‘पुढारी’ने केले आहे. मराठी गटाच्या एकजुटीतून आपली उपमहापौरपदी निवड झाली आहे. पुढील काळात शहर आणि नागरिकांच्या समस्या सोडवायच्या आहेत. महापालिकेतील ठरावांची अंमलबजावणी होत नाही. याकडे लक्ष देऊन सातत्याने बैठकीच्या आयोजनांतून अधिकारी वर्गावर वचक राखण्याचा प्रयत्न केला जाईल. शहरात महिला स्वच्छतागृहांची अडचण आहे. याचीही विशेष दखल घेण्यात येईल. विकासकामांना चालना देण्याबरोबरच गटाच्या कामात सुसूत्रता, सुसंवाद घडत राहावा, यासाठी प्रयत्नशील राहीन. उपमहापौरपदानंतर चारही स्थायी समित्यांवर मराठी भाषिकांचे वर्चस्व राहावे, यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन, असेही पुजारी यांनी स्पष्ट केले. 

माजी उपमहापौर नागेश मंडोळकर, मीना वाझ तसेच विनायक गुंजटकर यांनी दै. ‘पुढारी’च्या कार्याचा गौरव  केला. यावेळी माजी उपमहापौर संजय शिंदे, रेणू मुतगेकर, अनिल मुचंडीकर, सुधा भातकांडे, रुपा नेसरकर, पुंडलिक परिट व माजी महापौर आप्पासाहेब पुजारी उपस्थित होते.