होमपेज › Belgaon › नवा पूल बनला आणखी धोकादायक

नवा पूल बनला आणखी धोकादायक

Published On: Jun 07 2018 2:04AM | Last Updated: Jun 07 2018 12:20AM खानापूर :प्रतिनिधी

बेळगाव-पणजी महामार्गावरील मलप्रभा नदीच्या पुलाचे कठडे धोकादायक बनले आहेत. शहराच्या बाजुकडील संरक्षण खांब मोडून पडल्याने सताड मृत्यूचे दरवाजे प्रवाशांच्या अपघाताची वाट बघत आहेत. 
गेल्या वर्षभरात नगरपंचायतीने या पुलाच्या दुरुस्तीसाठी महामार्ग प्राधिकरणाच्या धारवाड विभागाला तीनवेळा पत्र पाठविले आहे. तरीही यंत्रणेचे डोळे उघडलेले नाहीत.

नव्या पुलाच्या दोन्ही बाजूच्या कठड्याचे लोखंडी पाईप गायब झाल्याने हा पूल अत्यंत धोकादायक बनला आहे. पादचार्‍यांना जीव मुठीत घेवून पूल ओलांडावा लागतोे. रुमेवाडी, रुमेवाडी क्रॉस, करंबळ, शेडेगाळी, हारुरी या भागातील बरेच विद्यार्थी या पुलावरुन चालत खानापूरला येतात. मात्र पावसामुळे पुलावर दोन्ही बाजुला पाणी साचत असून भरधाव येणार्‍या वाहनांमुळे साचलेले पाणी पादचार्‍यांच्या अंगावर उडतेे. वाहनांना चुकवण्याच्या प्रयत्नात विद्यार्थी कठड्याच्या अगदी जवळ जात असल्याने त्यांना धोका आहे.

वास्तविक पुलावर साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी जागोजागी छिद्रे सोडण्यात आली आहेत. पण बरीच वर्षे मातीचा थर जाऊन बसल्याने पुलावरील छिद्रे बुजली आहेत. परिणामी पुलावरील पाण्याचा निचरा होणे बंद झाले आहे. त्याकरिता जोराच्या पावसाला सुरुवात होण्यापूर्वी बुजलेली छिद्रे खुली करुन पादचार्‍यांचे हाल तरी दूर करण्याची गरज आहे. पुलाची उभारणी करताना दोन्ही बाजूला पिलर उभा करून त्यामधून लोखंडी पाईप घालण्यात आले होते. महामार्गावरुन येणार्‍या वाहनांना पुलाचा अंदाज यावा. तसेच एखादे वाहन रस्त्यावरुन घसरल्यास ते नदीत कोसळू नये, यासाठी संरक्षण यंत्रणा म्हणून हे खांब उभारण्यात आले होते. 

तथापि, संरक्षक कठड्याची देखरेख ठेवण्यात आली नसल्याने काही ठिकाणी केवळ पाईपांचे अवशेष शिल्लक आहेत. परिणामी दोन्ही पिलरमधील जागा पोकळ बनल्याने त्या पोकळ जागेतून अपघात झाल्यास दुचाकी वाहन अगदी सहज मलप्रभा नदीत पडू शकते.

बेळगाव-पणजी महामार्ग सध्या राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग झाला आहे. या पुलावरुन दररोज हजारो वाहने ये-जा करत असतात. त्यामुळे संभाव्य धोका ओळखून दोन्ही बाजुच्या कठड्याला केवळ पाईपच नव्हे तर दोन्ही बाजुने सात ते आठ फुटाची जाळी मारणे गरजेचे आहे.