बेळगाव : प्रतिनिधी
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बेडकीहाळ येथील सभेत बोलताना ‘माफ करा मला मराठी येत नाही’ अशी दिलगीरी व्यक्त केली होती. त्यावरून प्रा. एन. डी. पाटील यांनी मुख्यमंत्र्यावर निशाना साधला आहे. जांबोटी व आंबेवाडी येथे झालेल्या सभेत प्रा. पाटील यांनी याबाबत टीकेची झोड उठवली आहे.
ज्या मतदारासमोर मतांची याचना करता त्यांची भाषा तुम्हाला समजत नसेल तर तुम्हाला त्यांच्याकडे मते मागण्याचा अधिकार नसल्याचे त्यांनी खडसावले.कर्नाटक सरकारने सातत्याने सीमाभागातील मराठी भाषिकावर कानडीकरणाचा वरवंटा फिरविण्यात धन्यता मानली आहे. यामध्ये सीमाभागातील मराठी बांधव भरडले जात आहेत. त्यांच्या अडचणीची कदर करण्याचे काम कर्नाटकाने कधीच केले नाही. यामुळे मुख्यमंत्र्याचे वक्तव्य म्हणचे मोठा विनोद असल्याचे मत अनेकाकडून व्यक्त होत आहे.
मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी बेडकीहाळ येथील सभेत दिलगीरी व्यक्त केली. याबाबत बोलताना एन. डी. पाटील जांबोटी येथे म्हणाले, जर मराठी येत नसेल केंव्हा त्यांनी तसा प्रयत्नही केला नसेल तर येथील मराठी भाषकांना होणारा त्रास त्यांना कसा समजणार? आंबेवाडीतील सभेत डॉ. एन. डी. म्हणाले, मराठी येत नसेल तर सिध्दरामय्यांना येथील नागरिकांनी खडसावून जाब विचारायला हवा. तुमची भाषा आम्हालाही समजत नाही. त्यामुळे आमच्या मायमराठीच्या राज्यात आम्हाला जावू द्या.
येडियुराप्पांचे आगीत तेल
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मराठी येत नसल्याबद्दल दिलगीरी व्यक्त केली. याचे राजकीय भांडवल करत भाजप राज्याध्यक्ष येडियुराप्पा यांनी थेट मराठी भाषिकांना आपले शत्रू ठरवले आहे. मराठी भाषिक हे कर्नाटकाचे शत्रू असून त्यांची दिलगीरी व्यक्त करणे म्हणजे राज्याचा अपमान झाला असल्याचे वक्तव्य केले आहे.