Sat, Jul 20, 2019 10:43होमपेज › Belgaon › मुलगा नसल्याच्या द्वेषातून जावेच्या मुलाचा बुडवून खून

मुलगा नसल्याच्या द्वेषातून जावेच्या मुलाचा बुडवून खून

Published On: Aug 26 2018 1:27AM | Last Updated: Aug 26 2018 1:00AMउगार खुर्द : वार्ताहर  

आपल्याला दोन्ही मुलीच आहेत, मुलगा नाही पण चुलत जाऊबाईला मुलगा आहे, या द्वेषातून जयश्री बाहुबली अलासे हिने आपली चुलत जाऊ रूपा राजू अलासे हिच्या दोन वर्षे वयाच्या चिमुकल्याला बॅरलमध्ये बुडवून मारल्याची घटना शेडबाळ गावात घडली आहे. तशी तक्रार पोलिसांत नोंद झाली आहे. कार्तिक असे मुलाचे नाव आहे.

शेडबाळ (ता. कागवाड) येथील राजू तात्यासाहेब अलासे आणि त्यांची पत्नी रूपा शुक्रवारी सकाळी मिरज येथे दवाखान्यास गेले होते. आपल्या दोन वर्षे वयाच्या कार्तिक या मुलास त्याच्या आजीसह घरात सोडून गेले होते. घराच्या शेजारीच राहणार्‍या जयश्रीने आजी बाहेर गेल्याची संधी साधून झोपलेल्या कार्तिकला उचलून नेऊन आपल्या घरातील पाण्याने भरलेल्या बॅरलमध्ये बुडवून ठार केले तसेच कोणास संशय येऊ नये म्हणून बॅरलवर झाकण ठेवून घरातील सामान विस्कटून टाकले आणि लाईट बंद करून बेपत्ता झाली. बाहेर गेलेली कार्तिकची आजी घरी परत आल्यानंतर तिला झोपलेला कार्तिक दिसला नाही. त्यामुळे तिने आसपास कार्तिकबद्दल चौकशी केली,  तरी कार्तिक सापडला नाही. जयश्रीचा नवरा बाहुबली घरी आला आणि पाणी घेण्यासाठी बॅरलवरील झाकण काढताच त्याला कार्तिकाचा तरंगणारा मृतदेह आढळला. त्याने त्वरित मृतदेह बाहेर काढला.कार्तिकचे वडील राजू अलासे यांनी पोलिसांत जयश्रीविरोधात तक्रार केली आहे. अथणी सीपीआय एच. शेखरप्पा आणि कागवाड पीएसआय समीर मुल्ला यांनी घटनास्थळी भेट दिली असून पोलिस तपास सुरू आहे. जयश्री अजूनही बेपत्ताच आहे.