Fri, Jul 19, 2019 07:06होमपेज › Belgaon › निपाणीजवळ अज्ञाताचा खून

निपाणीजवळ अज्ञाताचा खून

Published On: Jul 23 2018 1:07AM | Last Updated: Jul 23 2018 12:23AMनिपाणी : प्रतिनिधी

येथून 5 कि.मी.वरील गवाणी रोडला लागून असलेल्या चरीत सुमारे  50 वर्षीय अज्ञात इसमाचा गळा आवळून, तसेच डोक्यावर अवजड वस्तूने घाव घालून खून झाल्याची घटना रविवारी सकाळी सातच्या सुमारास उघडकीस आली. गळा आवळण्यापूर्वी व्यक्तीच्या तोंडात बोळाही कोंबला होता. रविवारी रात्री उशिरापर्यंत खून झालेल्या व्यक्तीची ओळख पटली नव्हती. 

मृत व्यक्तीच्या अंगावर गुलाबी रंगाचा शर्ट, आतमध्ये तपकिरी रंगाचे स्वेटर, पांढरे बनियन, निळ्या रंगाची अंडरवेअर व दोन्ही गुडघ्यांना नीकॅप आहे. मृतदेह बेळगाव येथील सरकारी रुग्णालयाच्या शवागृहात पाठविण्यात आला आहे. 

दुपारी बेळगावहून आलेल्या पूजा या श्‍वानाने मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला; पण बराच वेळ श्‍वान परिसरातच घुटमळले. मृताची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी त्याचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल करुन ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. तपासासाठी कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी, गडहिंग्लज परिसरात पथके रवाना केली. 

मृत व्यक्ती कोल्हापूर जिल्ह्यातील असावी, असा अंदाज पोलिसांनी बांधला असून त्यादृष्टीने  तपास चालविला आहे.

गवाण गावच्या वेशीवर पाण्याच्या टाकीजवळ चरीत मृतदेह पडल्याचे काही शेतकर्‍यांच्या निदर्शनास आले. त्यांनी निपाणी  पोलिसांना  माहिती दिली. घटनास्थळी शहर पीएसआय निंगनगौडा पाटील, साहाय्यक फौजदार एम. जी. निलाखे, डी. बी. कोतवाल, हवालदार संदीप मातीवड्डर, एस. एस. चिकोडी, उदय कांबळे यांनी भेट देऊन पाहणी केली. उपअधीक्षक दयानंद पवार यांनीही घटनास्थळी  भेट दिली. 

खूनाचे सर्कल एकच

गेल्या पाच वर्षात ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील आडी डोंगर व सौंदलगा हद्दीत पाचजणांचे अशाचप्रकारे खून करुन मृतदेह टाकून दिल्याचे उघडकीला आले आहे. मात्र खून दुसरीकडे करून मृतदेह गवाणीजवळ टाकण्यात आल्याचा अंदाज आहे.