Tue, Mar 26, 2019 22:01होमपेज › Belgaon › निपाणीत भांडण मिटविण्यास गेलेल्याचा बळी

निपाणीत भांडण मिटविण्यास गेलेल्याचा बळी

Published On: Feb 01 2018 1:42AM | Last Updated: Jan 31 2018 11:45PMनिपाणी : प्रतिनिधी

बकरे कापण्याच्या सुरीने एका युवकाने आपल्या बहिणीच्या नवर्‍याचा खून केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. रमजान मलिकजान अरब (वय 32, मूळ गाव हिरेकोडी, सध्या रा.अमलझरी रोड, आंबेडकर नगर, निपाणी) असे मृताचे नाव असून पोलिसांनी हैदरअली गुलमहंमद मुजावर (वय 36, रा.अमलझरी रोड, हिदायतनगर, निपाणी) याला अटक केली आहे. 

हैदरअली येथील मटण मार्केटमध्ये काम करतो. पाच वर्षांपूर्वी त्याचा विवाह झाला असून त्याला दोन मुले आहेत. मात्र, काही दिवसांपासून त्याचे व पत्नीचे वारंवार भांडण होत होते. मंगळवारी रात्रीही या दोघाांत भांडण जुंपले. हैदरच्या आईने याची कल्पना आपला जावई रमजानला दिली. रमजानने मेहुणा हैदरच्या घरी जाऊन भांडण मिटविण्याचा प्रयत्न केला. यावेळी रमजान व हैदरमध्ये जोरदार वादावादी झाली. रागाच्या भरात हैदरने आपल्याकडील बकरे कापण्याचा सुरी रमजानच्या पोटात भोसकल्याने तो रक्तबंबाळ अवस्थेत  खाली कोसळला. 

हैदरच्या पत्नीसह आईने आरडाओरड केल्याने शेजार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली व  रमजानला सरकारी रुग्णालयात हलविले. त्यानंतर त्याला तातडीने कोल्हापूरच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान मध्यरात्री 12.30 च्या सुमारास रमजानचा मृत्यू झाला.

सीपीआय किशोर भरणी, एएसआय एम. जी. निलाखे यांच्या पथकाने संशयित हैदरला बुधवारी सकाळी ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्यावर शहर स्थानकात रमजान यांची पत्नी वहिदा हिने दिलेल्या फिर्यादीनुसार खुनाचा गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली. 

बुधवारी सकाळी अतिरिक्त जिल्हा पोलिस प्रमुख रवींद्र गडादी, उपअधीक्षक दयानंद पवार, नगरसेवक जुबेर बागवान यांनी घटनास्थळी भेट दिली. रात्री उशिरा रमजान याच्यावर हिरेकोडी येथे मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले.  त्याच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.