Mon, Jan 21, 2019 19:59होमपेज › Belgaon › खानापूर न्यायालयासमोर चिखलच चिखल

खानापूर न्यायालयासमोर चिखलच चिखल

Published On: Aug 15 2018 2:05AM | Last Updated: Aug 14 2018 8:38PMखानापूर : प्रतिनिधी

हलकर्णी ग्रा. प. अखत्यारित येणार्‍या खानापूर तालुका वरिष्ठ दिवाणी न्यायालयाच्या प्रवेशद्वारावरील रस्त्यावर सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. ठिकठिकाणी खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने डबक्यातून वाट काढताना नागरिकांना कसरत करावी लागत आहे.

बेळगाव-गोवा महामार्गाला लागून गणेशनगर वसाहतीला जोडणारा संपर्क रस्ता आहे. या रस्त्याच्या प्रारंभी दिवाणी न्यायालयाची इमारत आहे. या ठिकाणी तिन्ही न्यायालयांचे कामकाज चालते. याशिवाय गांधीनगर-गणेशनगर या वसाहतींना जोडणारा हा महत्त्वाचा रस्ता आहे.काही वर्षांपूर्वी या रस्त्याचे खडीकरण करण्यात आले होते. मात्र नंतर रस्त्याच्या विकासाकडे दुर्लक्ष झाल्याने ठिकठिकाणी चरी व खड्डे पडले आहेत. ग्रा. पं. कडून साधी डागडुजीही न झाल्याने गणेशनगरवासियांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

सध्या सुरु असलेल्या संततधार पावसामुळे डबक्यांनी संपूर्ण रस्ताच व्यापून टाकला आहे. दुचाकीधारकांना तर तारेवरची कसरत करत वाट काढावी लागत आहे. या मार्गावरुन वकीलवर्गालाही रोजची ये-जा करावी लागते. शालेय विद्यार्थ्यांना समोरुन येणारे वाहन बघून लांबवरच थांबून रस्ता मोकळा होण्याची प्रतीक्षा करावी लागते. चिखलमिश्रित पाणी अंगावर उडून कपडे घाण होण्याचे प्रकार नित्याचे झाल्याने या रस्त्यावरुन चालत जाण्याचे धाडस बर्‍याचदा अंगलट येत आहे.न्यायालयाच्या प्रवेशद्वारावरच सांडपाणी आणि चिखलामुळे बकाल अवस्था निर्माण झाल्याने हलकर्णी ग्रा. पं. ने तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी रहिवाशांतून करण्यात येत आहे.