Thu, Jul 18, 2019 10:29होमपेज › Belgaon › सीमाप्रश्‍नी प्रसंगी रायगड येथे आंदोलन

सीमाप्रश्‍नी प्रसंगी रायगड येथे आंदोलन

Published On: Jan 18 2018 1:48AM | Last Updated: Jan 17 2018 11:36PM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी

सीमावासीयांनी सर्व प्रकारचे लढे आजवर केले आहेत. अंतिम लढा म्हणून रायगड अथवा प्रतापगड येथे म. ए. समितीने आंदोलन हाती घ्यावे. शिवाजी महाराजांचे आशीर्वाद घेतल्यास लढ्याला निश्‍चित यश मिळेल, असे प्रतिपादन इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी केले.

तालुका म. ए. समितीच्यावतीने बुधवारी कंग्राळी (खु.) येथे हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. त्यावेळी इंद्रजित सावंत  बोलत होते. अध्यक्षस्थानी निंगोजी हुद्दार होते.
हुतात्मा चौकात हुतात्मा मारुती बेन्नाळकर व बाळू निलजकर यांच्या प्रतिमेचे मनोहर किणेकर, जि. पं. सदस्या सरस्वती पाटील, माधुरी हेगडे यांनी तर छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन निंगोजी हुद्दार यांनी केले.

वसंतराव मुळीक म्हणाले, बेळगावशिवाय संयुक्त महाराष्ट्र अधुरा आहे. यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. भाषावार  प्रांतरचना   करताना  सीमाभाग नैसर्गिक न्यायाने महाराष्ट्रात जाणे आवश्यक होता. मात्र, अन्यायाने हा भूभाग कर्नाटकात डांबला. सीमाभाग महाराष्ट्रात जावा यासाठी चार पिढ्यांनी त्याग केला. कर्नाटकाकडून मराठी माणसाला चेपण्याचे काम सुरू आहे. सीमाबांधवांवर होणार्‍या अत्याचाराचा जाब विचारण्याचे काम प्रत्येकवेळी कोल्हापूरने केले. ही जरब आम्ही कायम ठेवू. 

कोल्हापूर येथील संभाजी जगदाळे म्हणाले, जगाच्या इतिहासात सीमालढ्याच्या तोडीचा लढा नाही. लवकरच न्याय मिळणार आहे. तोपर्यंत संयम ठेवणे आवश्यक असून समितीच्या झेंड्याखाली मराठी जनतेने एकत्र राहावे .

मध्यवर्ती म. ए. समिती अध्यक्ष दीपक दळवी म्हणाले, कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता सीमालढा सामान्य जनतेच्या बळावर धगधगता ठेवला आहे. लढ्यामध्ये अडथळा निर्माण करणारे आता वेगळी भाषा बोलून बुद्धिभेद करत आहेत. त्यांच्यापासून सावध राहावे.

माजी आ. मनोहर किणेकर म्हणाले, समिती म्हणजे नेते निर्माण करण्याचा कारखाना नाही. निवडणुका लोकेच्छा प्रकट करण्यासाठी लढविल्या जातात. त्याला साथ देण्याचे काम जनतेने करावे.
सरचिटणीस एल. आय. पाटील, युवा आघाडी अध्यक्ष अ‍ॅड. शाम पाटील, जि. पं. सदस्या सरस्वती पाटील, अर्जुन गोरल यांनी मनोगत व्यक्त केले. हुतात्मा बेन्नाळकर यांची कन्या इंदुमती यांचा साडी, चोळी देऊन सन्मान करण्यात आला. प्रकाश मरगाळे, एस. एल. चौगुले, ग्रा. पं. अध्यक्षा लता पाटील, उपाध्यक्ष गणपत सुतार आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक बी. डी. मोहनगेकर यांनी तर सूत्रसंचालन रमेश चव्हाण यांनी केले.