Thu, Feb 21, 2019 03:01होमपेज › Belgaon › आला सहलींचा महिना

आला सहलींचा महिना

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा


जांबोटी : विलास कवठणकर

दरवर्षी ऑक्टोबरपासून शालेय सहलींचे आयोजन करण्यात येते. तसेच कौटुंबिक सहलीही याच दिवसात काढण्यात येतात. यासाठी निसर्गरम्य, धार्मिक, ऐतिहासिक ठिकाणांची निवड करण्यात येते. खानापूर तालुक्यातील हब्बनहट्टीच्या श्री स्वयंभू मारुती तीर्थक्षेत्राला अधिक पसंती देण्यात येत आहे.

कणकुंबी माउली मंदिराजवळ उगम पावणार्‍या मलप्रभेच्या पात्रात अनेक प्रसिध्द मंदिरे वसली आहेत. यापैकी हब्बनहट्टीच्या स्वयंभू मारुती मंदिराचे नाव अग्रस्थानी घेतले जाते. अलिकडच्या पाच वर्षात या तीर्थक्षेत्राची शालेय सहलींसाठी निवड करण्यात येत आहे. 

स्वयंभू मारुतीची मूर्ती मलप्रभेच्या पात्रात असल्याने पावसाळ्याचे दोन महिने मंदिर पाण्यातच असते. उन्हाळ्यात मंदिरासमोरुन वाहणार्‍या पाण्यात डुंबण्याचा आनंदच वेगळा आहे. या ठिकाणी लगतच पलिकडे असलेल्या श्रीराम रसवंतीगृहाकडे जाणार्‍या साकवाचे खास आकर्षण आहे.  जांबोटी पश्‍चिम भागात येणार्‍या शालेय सहली प्रथम हब्बनहट्टीच्या स्वयंभू मारुती तीर्थक्षेत्राची निवड करतात.

जांबोटीपासून सहा तर बैलूरपासून पाच किमी अंतरावरील स्वंयभू मारुती मंदिराला येणार्‍या सहली तसेच जवळच्या शाळांच्या वनभोजन सहलीही वाढल्या आहेत.  लहान मुलांसाठी खेळणी, पाळण्यांची व्यवस्था स्वयंभू मारुती देवस्थान कमिटीच्यावतीने मुलांसाठी खेळणी, पाळण्यांची व्यवस्था करून देण्यात आली आहे. यामुळे बालचमूचे मनोरंजन होत आहे. येथे सुंदर बगीचाही पाहण्याजोगा आहे. देवाचीहट्टीकडे जाणार्‍या मार्गावरील मलप्रभा नदीवर बाधलेला बंधाराही लक्ष वेधून घेतो.