Wed, Apr 24, 2019 19:29होमपेज › Belgaon › ‘मान्सून’ रूसला,बळीराजा थबकला!

‘मान्सून’ रूसला,बळीराजा थबकला!

Published On: Jun 25 2018 1:46AM | Last Updated: Jun 24 2018 9:15PMबेळगाव : प्रतिनिधी

मागील दहा दिवसापासून रूसलेल्या मान्सून पावसामुळे जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. पावसाअभावी जिल्ह्यातील सुमारे 2 लाख हेक्टर क्षेत्रातील खरीप हंगामातील पेरणी रखडली आहे. तर पेरणी केलेल्या क्षेत्रातील पिके पावसाविना कोमेजून जाऊ लागली असल्याने दुबार पेरणीचे सावट  निर्माण झाले आहे. मान्सून पावसाने पाठ फिरवल्याने बळीराजा थबकल्याचे चित्र आहे.

यावर्षी मान्सूनपूर्व पावसाने हंगामाच्या सुरुवातीलाच जोरदार हजेरी लावली होती. यामुळे शेतकर्‍यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र त्यानंतर पावसाने पाठ फिरविली आहे. मृग नक्षत्र कोरडे गेले आहे.कोरड्या नक्षत्रामुळे जिल्ह्यातील अनेक भागातील पेरणीची कामे खोळंबली आहेत. बेळगाव, खानापूर, चिकोडी, हुकेरी तालुक्यात मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हजेरी लावली होती.खरीप हंगाम साधण्यासाठी शेतकरी सज्ज झाला आहे.

मोठ्या प्रमाणात पेरणी केली आहे. यावर्षी कृषी खात्याने 6 लाख 79 लाख हेक्टर क्षेत्रात पेरणीचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यापैकी 3 लाख 96 हजार 116 लाख हेक्टर क्षेत्रात पेरणीची कामे उरकली आहेत. केवळ 58 टक्के पेरण्या झाल्या आहेत. जिल्ह्यातील उर्वरित क्षेत्रातील पेरणी खोळंबली आहे. या भागातील शेतकर्‍यांच्या नजरा आकाशाकडे लागून राहिल्या आहेत.जिल्ह्यात भात सध्या 43,325 हेक्टर, जोंधळा 3,690 हेक्टर,   नाचणी 65 हेक्टर, मका 25,407 हेक्टर, तूर 5,105 हेक्टर, मूग 27,779 हेक्टर, उडीद 4,420 हेक्टर, भुईमूग 13,805 हेक्टर, सूर्यफूल 1,284 हेक्टर, तीळ 8.8 हेक्टर, सोयाबीन 69,462 हेक्टर, कापूस 16, 804 हेक्टर व ऊस 1.82 लाख हेक्टर क्षेत्रात आहे. 

सर्वाधिक क्षेत्र उसासाठी वापरण्यात येते. त्याखालोखाल सोयाबीन आणि भात पीक घेण्यात येते. भात पीक खानापूर आणि बेळगाव तालुक्यात अधिक प्रमाणात घेण्यात येते. सध्या भात पेरणीची कामे अंतिम टप्प्यात असली तरी रोपलागवडीची कामे जुलै महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे.सध्या शेतकरी कोळपणी आणि आंतरमशागतीच्या कामात गुंतला आहे.