Thu, May 23, 2019 14:24
    ब्रेकिंग    होमपेज › Belgaon › मान्सूनमुळे त्यांची घसघशीत चांदी

मान्सूनमुळे त्यांची घसघशीत चांदी

Published On: Aug 09 2018 1:35AM | Last Updated: Aug 08 2018 10:38PMबेळगाव : प्रतिनिधी

मान्सूनमुळे आळंबी विक्रेत्यांची घसघशीत चांदी होत आहे. आळंबीच्या डझनाचा दर तब्बल 400 रुपये असल्याने त्यांनी बक्कळ कमाई होत आहे. पश्‍चिम घाटातील हे चित्र आहे. 

मान्सून हंगामात पश्‍चिम घाटात आळंबी मोठ्या प्रमाणात उगवते. पश्‍चिम घाटातील अनेक खेड्यांतील ग्रामस्थांना आळंबी विक्री म्हणजे पूर्णवेळ रोजगार मिळत आहेत. या आळंबीमध्ये प्रोटीन व इतर पौष्टीक घटक असल्यामुळे त्याला शहरी भागातून मोठ्या प्रमाणात मागणी असते. गोव्यातही त्याची विक्री केली जाते. 

या आळंबीच्या अनेक जातीअसून त्यातील काही खाण्यायोग्य नाहीत. याची माहिती खेड्यातील लोकांंना असते. खाण्यायोग्य आळंबी हेरून हे लोक दिवसभर ते घेऊन महामार्गाशेजारी विक्रीला बसतात. यामध्ये महिला विक्रेत्यांची संख्या जास्त दिसून येते. भल्या सकाळी हे विक्रेते आळंबीच्या टोपल्या घेऊन विक्रीसाठी खेड्यांतून बाहेर पडतात. आळंबीबरोबरच दोडकी, वांगी, फ्लॉवर, शेवग्याच्या शेंगा असा भाजीपालाही या महिला घेऊन जातात. यामुळे खरेदीदारांना एकाच ठिकाणी आळंबीसह इतर भाज्याही विकत मिळतात. आळंबीची उगवण जुलै ते सप्टेंबर या काळात होत असते. कारवार, कुमठा, भटकळ आदी बाजारपेठातून आळंबीला मोठी मागणी असते. आळंबीचा शंभर ग्रॅमचा दर 300 ते 400 रुपये आहे. शंभर ग्रॅममध्ये साधारण डझनभर आळंबी बसतात. शंभरग्रॅमच्या पिशव्यातून त्याची विक्री केली जाते. असे एका विक्रेत्याने सांगितले. 

मान्सूनच्या काळात अनेक खेडूतांचा आळंबी विक्री हा मोठा व्यवसाय बनलेला असतो. परंतु वनखात्यातील उगवलेली आळंबी नेल्यास ग्रामस्थांना बंदी आहे. परंतु पश्‍चिम घाटातील काही भागात म्हणजे कारवार., कुमठा परिसरात आळंबीची नैसर्गिक वाढ होत असते. कडावाडा, किन्नर, सिद्दर, या कारवार तालुक्यातील खेड्यामध्ये व्यापक प्रमाणात आळंबी मिळतात. याप्रमाणे होन्नावर आणि भटकळ तालुक्यातही आळंबी मिलतात. एका आळंबीचा दर अडीच ते तीन रुपये आहे. परंतु कारवारमध्ये परंतु कारवारमध्ये याची विक्री वजनावर होते. 

केवळ मान्सून काळातच आळंबी उगवत असल्याने त्याचा आस्वाद घेण्यासाठी खवय्यांची मोठी मागणी असते. पावसाळा संपल्यानंतर आळंबी दुर्मीळ होतात. अनेकांच्या घरी हंगामी आळंबी खाण्याची परंपराच आहे. आळंबी शरीराला पोषक असतात. आळंबीपासून सांबार किंवा त्यांची मंचुरी करून खाता येते.