Tue, Jul 23, 2019 06:56होमपेज › Belgaon › प्रश्‍नांना हवे कायमस्वरुपी ‘उत्तर’...

प्रश्‍नांना हवे कायमस्वरुपी ‘उत्तर’...

Published On: Jun 08 2018 1:21AM | Last Updated: Jun 07 2018 11:22PMबेळगाव : प्रतिनिधी

सलग दोनवेळा विधानसभेत प्रतिनिधित्व केलेल्या फिरोज सेठ यांना धूळ चारत निवडून आलले नवखे आ. अनिल बेनके यांच्यासमोर सर्वांत मोठे आव्हान असेल ते सामाजिक सलोख वाढवण्याचे. भावनेच्या राजकारणावर आरुढ होवून मतदारांनी विजयाची माळ बेनकेंच्या गळ्यात घातली आहे. त्याचे उत्तर विकासकामांच्या माध्यमातून येत्या काळात अ‍ॅड. बेनके यांना द्यावे लागणार आहे.
बेळगाव दक्षिण मतदारसंघात आजवर काँग्रेसचा वरचष्मा होता. मात्र धार्मिक मुद्यावर मतांचे ध्रुवीकरण झाले. त्याचबरोबर मध्यवर्ती म. ए. समितीने उमेदवार दिला नाही. यामुळे आ. अनिल बेनके यांचा विजय सुकर झाला.

शहरातील प्रमुख गल्ल्यांचा समावेश या मतदारसंघात आहे. त्याचबरोबर शहरासभोवती वसलेल्या उपनगरांचा व यमनापूर, कणबर्गी, बसवन कुडची या भागाचाही समावेश आहे. मतदारसंघात लिंगायत, मुसलमान आणि मराठा मतदारांची संख्या लक्षणीय आहे. काँग्रेसची मदार एकगट्टा मुसलमान मतावर होती. मात्र पहिल्यांदाच धार्मिक मुद्द्यावर मतांचे ध्रुवीकरण झाले. हिंदू मतदार काँग्रेस विरोधात एकवटला आणि काँग्रेसला ही जागा गमवावी लागली.

वाढत्या शहरीकरणाची सर्वाधिक झळ या मतदारसंघाला बसली आहे. शहरातील मुख्य गल्ल्या वाहतूक समस्येने ग्रासल्या आहेत. तर उपनगरांना विकासाची प्रतीक्षा आहे. वाहतूक, पाणी, भूमीगत वीज वाहिन्या या सुविधांबरोबरच जातीय दंगली, बेकायदेशीर कत्तलखाना, ग्रामीण भागात बुडाकडून होणारे भूसंपादन अशा वेगवेगळ्या आव्हानांना अ‍ॅड. बेनके यांना भिडावे लागणार आहे.शहरात एकीकडे विकसित झालेला हनुमाननगर, सह्याद्रीनगर, जाधवनगर सारखा भाग आहे, तर दुसरीकडे मूलभूत सुविधा मिळविण्यासाठी झगडणार्‍या मलप्रभानगरसारख्या वसाहती आहेत. या सार्‍यांचाच प्रश्‍न आ. बेनके यांना हाताळावा लागणार आहे. स्थानिकांच्या सहकार्याने तोडगा काढावा लागणार आहे. यासाठी इच्छाशक्तीची आवश्यकता असून यामध्ये कसोटी लागणार आहे.