Wed, Apr 24, 2019 11:44होमपेज › Belgaon › मांजाने केला विद्यार्थ्यांचा घात ?

मांजाने केला विद्यार्थ्यांचा घात ?

Published On: Sep 11 2018 1:36AM | Last Updated: Sep 10 2018 11:28PMबेळगाव : प्रतिनिधी

गणेशपूर येथून शनिवारपासून बेपत्ता झालेल्या दोन शाळकरी मुलांचा हिंडलगा येथील कल्मेश्‍वर मंदिर जवळील तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री उशिरा उघडकीस आली. तलावात पडलेल्या मांजाने त्यांचा घात केला असावा, अशी चर्चा सुरू आहे. मृतदेह काढतेवेळी त्यांच्या पायात अडकलेला मांजा मिळाला. अंश अनंत शिंदे (14), रोहन भारत खोरागडे (15, दोघेही रा. गणेशपूर ज्योतीनगर) अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. सदर विद्यार्थी शनिवारपासून घरातून बेपत्ता झाले होते. मुले बेपत्ता झाल्याने कुटुंबीयांनी शोध चालविला होता. याप्रकरणी कॅम्प पोलिस स्थानकात तक्रार नोंदविली होती. मात्र त्यांचा तपास लागला नव्हता.

या विद्यार्थ्यांचे आई-वडील बेळगावात येऊन कचरा वेचायचे काम करतात. यातील अंशचे वडील माळी आहेत. रविवारी सकाळी हिंडलगा येथे दोन मुलांचे चप्पल आणि कपडे काही जणांना आढळून आले होते. त्यानुसार गावात विचारपूस करण्यात येत होती. मात्र, गावातील कोणीही बेपत्ता झाले नसल्याचे दिसून आले. त्यामुळे अधिक चौकशी करण्यात आली नाही. मात्र रविवारी रात्री उशिरा हिंडलगा येथील तलावामध्ये दोन मृतदेह तलावात तरंगताना काहीजणांना निदर्शनास आले.  सदर माहिती ग्रा. पं. सदस्य रविकुमार कोकितकर यांना कळविण्यात आली. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तंरगणारे मृतदेह पाहून याची माहिती ग्रामीण पोलिसांना कळविली. 

काकती पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मात्र अंधार असल्यामुळे अडचण निर्माण झाली होती. यामुळे कोकितकर यांनी ग्रा. पं. कर्मचार्‍यांच्या सहाय्याने विजेची सोय करण्यात आली. त्यानंतर कॅम्प व काकती पोलिसांनी व गावातील  युवकांच्या मदतीने रात्री उशिरा मृतदेह बाहेर काढले. सदर मृतदेह गणेशपूर येथून  बेपत्ता झालेल्या शाळकरी मुलांचे असल्याचे उशिरा स्पष्ट झाले. 

सोमवारी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आले. गणेशपूर येथील स्मशानभूमीत दोन्ही विद्यार्थ्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दोघेजणही बेळगाव येथील दोन वेगवेगळ्या शाळेत  नववीच्या वर्गात शिकत होते. शनिवारी सकाळची शाळा संपवून दोघेही दुपारनंतर हिंडलगा येथील तलावात पोहायला गेले होते. त्याठिकाणीच पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती  पोलिसांकडून सांगण्यात आले. घटनेची नोंद ग्रामीण पोलिसस्थानकात झाली आहे. 

बॉक्साईट रोडवर असणार्‍या कल्मेश्‍वर तलावाजवळ ब्रम्हाचा तलाव म्हणून आहे. त्याठिकाणी पावसात मुबलक पाणी असते. यामुळे मुले पोहण्यासाठी याचा वापर करतात. त्याप्रमाणे अंश आणि रोहन हे दोघे पोहोण्यासाठी गेले होते. त्यावेळी दुर्दैवी घटना घडली. यामध्ये दोन मित्रांचा मृत्यू झाला. यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. रोहन हा एकुलता आहे.

कोकितकरांनी घेतले परिश्रम

ग्रा. पं. सदस्य रविकुमार कोकितकर यांनी तलावातील मृतदेह काढण्यापासून अंत्यसंस्कार होईपर्यंत विशेष परिश्रम घेतले. रविवारी रात्री 12 च्या सुमारास पोलिस अधिकारी मृतदेह काढण्यास चालढकल करत होते. त्यावेळी कोकितकर यांनी पुढाकार घेउन पोलिसांना मदत केली.