Fri, Mar 22, 2019 07:43होमपेज › Belgaon › मंत्रिपदाच्या लॉबिंगमध्ये हरवला ‘जल्‍लोष’

मंत्रिपदाच्या लॉबिंगमध्ये हरवला ‘जल्‍लोष’

Published On: May 28 2018 1:46AM | Last Updated: May 27 2018 8:32PMबेळगाव : प्रतिनिधी

विधानसभा निवडणूक पार पडली. निकालही लागला. मात्र कोणत्याही मतदारसंघात विजयाचा जल्लोष अभावानंच दिसला. कारण निकाल लागल्यानंतर राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आणि आमदारांनी अज्ञातस्थळी व बंगळूरमध्ये ठाण मांडले. राज्यात निजद व काँग्रेस युतीचे सरकार आल्यानंतर मंत्रिपदाचे लॉबिंग सुरू झाले. यामुळे बेळगाव ग्रामीण, खानापूर मतदारसंघात विजयानंतरचा जल्लोष झालाच नाही.

बेळगाव ग्रामीणमधून प्रथमच लक्ष्मी हेब्बाळकर व खानापूरमधून डॉ. अंजलीताई निंबाळकर  निवडून आल्या. बेळगाव व खानापूरमध्ये महिलाराज आले. बेळगाव ग्रामीणमध्ये आक्का तर खानापूरमध्ये ताईचे राज्य आले.

निवडणुकीआधी तीन दिवस कोण निवडून येणार, याची चर्चा रंगली होती. निवडणू निकालानंतर भाजपने सरकार स्थापन करण्याचा दावा केला. तीन दिवसातच मुख्यमंत्री येडियुराप्पा यांना बहुमताचा जादूई आकडा नसल्याने राजीनामा द्यावा लागला. तोपर्यंत निजद व काँग्रेसचे आमदार अज्ञातस्थळी होते. यानंतरच्या तीन दिवसाच्या घडामोडीत निजद व काँग्रेसची युती होऊन राज्यात सरकार स्थापन करण्याबरोबर मुख्यमंत्री म्हणून कुमारस्वामींनी शपथ घेतली. मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागणार याबाबत लॉबिंग सुरू आहे. यात दहा दिवस उलटले. निवडून आलेले आमदार बंगळूरला ठाण मांडून बसल्याने विजयाची मिरवणूक निघालीच नाही. विजयाचा जल्लोषही दिसला  नाही, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.  

निवडणुका सुरु झाल्या की आपलाच उमेदवार निवडून यावा, यासाठी कार्यकर्ते अथक परिश्रम घेतात. उमेदवार निवडून आला की त्याच दिवशी अथवा त्यानंतर विरोधकांच्या नाकावर टिच्चून विजयाचा जल्लोष साजरा केला जातो. गुलालाची उधळण, फटाक्याची आतषबाजी, घोषणाबाजी यामुळे मिरवणुकीत रंग भरतो. या माध्यमातून शक्तिप्रदर्शनही घडवून आणले जाते. मात्र ही संधीच प्राप्त झाली नाही. याला कारणीभूत आचारसंहिता असली तरी, त्यानंतर दंगलीचे गालबोट लागले परिणामी 22 तारखेपर्यंत 144 कलम लागू होते. यानंतर विजयी उमेदवाराची जल्लोषात मिरवणूक निघेल, अशी अपेक्षा होती.