Sun, Jun 16, 2019 12:10
    ब्रेकिंग    होमपेज › Belgaon › जि. पं. वर मंत्री जारकीहोळींचे वर्चस्व

जि. पं. वर मंत्री जारकीहोळींचे वर्चस्व

Published On: Jul 25 2018 1:37AM | Last Updated: Jul 24 2018 8:48PMबेळगाव : प्रतिनिधी

जि. पं. स्थायी समिती निवडणुका चुरशीच्या होतील, असा होरा राजकीय धुरंधरांकडून व्यक्त करण्यात येत होत्या. परंतु भाजप नेत्यांनी याकडे पाठ फिरवल्याने केवळ दहा सदस्यांना स्थायी समिती सदस्यपदी समाधान मानावे लागले. काँगे्रस पक्षात असणार्‍या बेदिलीचा फायदा भाजपला घेता आला नाही. निवडणुकीत पुन्हा एकदा मराठी भाषक सदस्यांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. मंत्री रमेश जारकीहोळी यांनी स्थायी समिती निवडणूक एकहाती जिंकली. पाच स्थायी समित्यांंची निवडणूक सोमवारी पार पडली. यामध्ये बेळगाव तालुक्याला दोन महत्त्वाची पदे मिळाली. जि. पं. उपाध्यक्ष हे पदसिद्ध अध्यक्ष असतात, तर शिक्षण आणि आरोग्य स्थायी समिती मोहन मोरे यांच्यानंतर रमेश गोरल यांच्याकडे आली आहे. यामुळे मराठी सदस्यांना चांगली संधी मिळाल्याचे दिसून आले.

जि. पं. मध्ये काँग्रेस सदस्यांची संख्या सर्वाधिक आहे. मात्र बहुमतासाठी त्यांना निजदने पाठिंबा दिला होता. यामुळे काँग्रेसला सत्ता मिळविणे सुलभ ठरले होते. परंतु, विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान रंगलेल्या सुंदोपसुंदीच्या राजकारणाचा फटका काँग्रेसला बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, सार्‍या शक्यता फोल ठरवत मंत्री रमेश जारकीहोळी यांनी स्थायी समिती निवडणूक एकहाती जिंकली. यामुळे जिल्ह्यातील राजकारणात त्यांचे वर्चस्व सिद्ध झाले आहे.

भाजप नेत्यांनी या निवडणुकीकडे पाठ फिरविली. सभागृहात चांगले संख्याबळ असतानादेखील प्रभावी नेत्यांनी यामध्ये भाग दर्शविला नाही. परिणामी दुय्यम नेत्यांना स्थायीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी कसरत करावी लागली. जिल्ह्यातील एकाही आमदार अथवा खासदाराने यामध्ये भाग घेतला नाही. यामुळे भाजपच्या केवळ दहा सदस्यांना स्थायी समिती सदस्यपदी स्थान मिळाले. राज्यात असणार्‍या निजद-काँग्रेस युतीचा फायदा यावेळी निजदला झाला. मंत्री जारकीहोळी यांनी शंकर माडलगी यांना कृषी आणि औद्योगिक स्थायी समिती अध्यक्षपदी संधी दिली.मागील स्थायी समितीमध्ये म. ए. समितीच्या दोन सदस्यांना स्थान मिळाले होते. यावेळीही दोन सदस्यांना संधी देण्यात आली. 

रमेश गोरल यांची दखल

सभागृहात सलग दुसर्‍यांदा सदस्य म्हणून कार्यरत असणारे येळ्ळूर जि. पं. सदस्य रमेश गोरल यांची दखल घेण्यात आली. सभागृहातील एक अभ्यासू सदस्य म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचा कामाचा उरक व लोकसंपर्क चांगला आहे. यामुळे शिक्षण आणि आरोग्य स्थायी समिती अध्यक्षपद त्यांना देण्यात आले. यापूर्वी हे पद मोहन मोरे या मराठी भाषकाकडे होते. त्यानंतर गोरल यांच्याकडे याची जबाबदारी सोपविली आहे.