होमपेज › Belgaon › पाच वर्षे गायब असणार्‍यांना जाब विचारा

पाच वर्षे गायब असणार्‍यांना जाब विचारा

Published On: Apr 08 2018 2:10AM | Last Updated: Apr 08 2018 12:03AMबेळगाव : प्रतिनिधी

सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीबरोबरच मराठी भाषिकांवर होणार्‍या प्रत्येक अत्याचाराला जाब विचारण्याचे काम समितीच्या कार्यकर्त्यांनी केले आहे. लढ्यासाठी कोट्यवधी खर्च केला आहे. लढाईवेळी गायब असणारे नेते आता प्रकट झाले असून उमेदवारी अर्ज, माघार, पाठिंबा या माध्यमातून दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पाच वर्षे गायब असणारे निवडणुकीच्या तोंडावर प्रकट झाले असून त्यांना जनतेने जाब विचारावा, असे रोखठोक आवाहन बैठकीत करण्यात आले.

विधानसभा निवडणुकीबाबत शनिवारी रंगुबाई भोसले कार्यालयात शहर म. ए. समितीची बैठक झाली. अध्यक्षस्थानी दीपक दळवी होते. बैठकीत एकीच्या मुद्द्यावर कार्यकर्त्यांचा उद्रेक झाला. कार्यकर्त्यांनी नेत्यांवर आरोप-प्रत्यारोप केले.

विधानसभा निवडणुकीत यश मिळविण्यासाठी मराठी भाषिकांच्या एकीची आवश्यकता आहे. सीमाभागातील मराठी भाषिकांमध्ये कोणत्याही प्रकारची बेकी नसून ती नेत्यांमध्ये आहे. ती आधी संपवा, अशी आग्रही मागणी कार्यकर्त्यांनी केली. 

माजी नगरसेवक गजानन पाटील म्हणाले, एकीसाठी प्रयत्न करणार्‍यांनी  मराठी माणसांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न चालवला आहे. अर्ज मागविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यांना जाब विचारणे आवश्यक आहे. आम्हाला विकास नसून सीमाप्रश्न महत्त्वाचा आहे. मोतेश बारदेसकर म्हणाले, कार्यकर्ते एक आहेत. सीमाप्रश्न सुटावा ही त्यांची तळमळ आहे. मात्र, नेत्यांमध्ये बेकी आहे. यामुळे कार्यकर्त्यांची गोची होत आहे.

श्रीकांत मांडेकर म्हणाले, उमेदवार निवडीची समितीची  पद्धत आहे. याला हरताळ फासून काही जण अर्ज मागवत आहेत. महिलांना उमेदवारी देण्याचे जाहीर करत आहेत. आले तर पाच नाही तर शून्य अशी वक्तव्ये करत आहेत. ही मनमानी असून मराठी जनतेने अशांना जाब विचारावा.

काही कार्यकर्त्यांनी नेत्यांनी एक होण्याचा हेका धरला. यावर प्रकाश मरगाळे म्हणाले, आम्ही सातत्याने एकीसाठी प्रयत्न केले आहेत. बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. मात्र काही जणाकडून हेतूत: वाकडी वाट धरण्यात येत आहे. एकाही मेळाव्याला हजर न राहणारे आता जागे झाले आहेत. कार्यकर्त्यांनी आपल्या मालमत्ता गहाण ठेवून सीमालढा लढविलेला आहे. दीड कोटीचे व्याज प्रत्येक महिन्याला भरावे लागत आहे. त्यांना एकीबाबत जाब विचारावा.

Tags : Belgaum, Belgaum news, m a committee, meeting, Workers, outbreak,