Wed, Jul 17, 2019 18:02होमपेज › Belgaon › संमेलनातून पुरोगामी विचारांचीघुसळण

संमेलनातून पुरोगामी विचारांचीघुसळण

Published On: Dec 19 2017 1:56AM | Last Updated: Dec 19 2017 12:56AM

बुकमार्क करा

बेळगाव : शिवाजी शिंदे

अण्णा भाऊ साठे आठव्या साहित्य संमेलनाचे रविवारी सूप वाजले. संमेलनातून सीमाभागात थंडावत चाललेल्या पुरोगामी विचारांची ज्योत पुन्हा एकदा चेतविण्यात संयोजकांना यश मिळाले. वैचारिक घुसळणीतून चळवळीतील कार्यकर्त्यांना बळ मिळाले आहे. यामुळे हे संमेलन खर्‍या अर्थाने सार्थकी झाले.

संमेलनाचा सारा डोलारा वैचारिक मांडणीवर उभा होता. कॉ. गोविंद पानसरे यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या कार्याला, साहित्याला व त्यांच्या चळवळीतील सहभागाला उजाळा देण्यासाठी या संमेलनाची संकल्पना मांडून ती कल्पना राबविली. याचा विस्तार आठ वर्षात झपाट्याने झाला. त्यातून वैचारिक जागराचे काम  नेटाने होत आहे.

संमेलनाध्यक्ष डॉ. माया पंडित यांनी समारोपाच्या भाषणात कॉ. साठे यांचे साहित्य वैश्‍विक दर्जाचे असल्याचे मत मांडले. कष्टकरी, कामकरी, दलित, वंचित, सर्वहारा समाजाच्या वेदनाना वाचा फोडणारे साहित्य अण्णा भाऊंनी लिहिले आहे.  परंतु, साहित्यात त्यांची दखल घेतली गेली नाही. त्यांच्यावर सातत्याने अन्याय झाला. ही सल मनात घेऊन संमेलनाच्या सत्रांचे आयोजन केले होते. संमेलनात अण्णा भाऊंच्या साहित्यावर तीन परिसंवाद होते. वेगवेगळ्या पातळीवर त्यांच्या साहित्याचे पदर उलगडण्याचा प्रयत्न त्यातून झाला.

सीमाभागातील मराठी भाषिकांची वेदना मांडणार्‍या ‘माझी मैना गावावर राहिली’ या छक्कडवर परिसंवाद ठेवण्यात आला होता. यासाठी मराठीच्या लढ्यात कार्यरत असणार्‍यांना बोलण्याची संधी देण्यात आली होती. परंतु, त्यामध्ये ऐनवेळी बोलणार्‍या प्रा. आनंद मेणसे यांनी बाजी मारली. छक्कडचा वेगवेगळ्या पातळीवर त्यांनी वेध घेतला.

संमेलनाचे उद्घाटक डॉ. गणेशदेवी यांचे भाषण अंतर्मुख करणारे ठरले. त्यांनी सामान्य जनतेला निर्भय बनण्याबरोबर व्यक्त व्हा अशी हाक दिली. आजूबाजूला निराशेचे ढग जमा झाले असले तरी आपल्या परीने पणती पेटविण्याचा त्यांचा संदेश खूप काही देऊन गेला. सत्ताधार्‍यांवर ओढलेले कोरडे आणि वास्तवाची त्यांनी करून दिलेली जाणीव संमेलनात अनोखी ठरली.

संमेलनात निमंत्रितांबरोबरच स्थानिक कविंचे संमेलन पार पडले. यामध्ये परिवर्तनवादी विचारांची मांडणी करणार्‍या कवितांनी  रसिकांच्या मनांचा ठाव घेतला. 
नीटनेटके नियोजन, वेळेत संपलेली सत्रे, परिसंवादात वक्त्यानी केलेली विषयांची मांडणी, भपकेबाज आणि सवंगपणाला दिलेला फाटा संमेलन आणि उपस्थित श्रोत्यांना श्रीमंत करून गेला.

कर्तव्यनिधीतून सामाजिक भान
संमेलनात शाहीर शीतल साठे  यांच्या गीतांचा कार्यक्रम पार पडला. हातात समतेचा डफ घेऊन दांभिकतेवर प्रहार करणार्‍या साठे यांच्या गीतांनी समाजात उठाव केला आहे. त्यांना कर्तव्यनिधी अर्पण करण्यात आला. यावेळी कर्तव्यनिधीसाठी श्रोत्यातून डफ फिरविण्यात आला. यामध्ये 10 हजार 600 रु. इतकी रक्कम जमा झाली.