Mon, Apr 22, 2019 12:40होमपेज › Belgaon › मायमराठीच्या संवर्धनासाठी सीमालढ्याला बळ द्या

मायमराठीच्या संवर्धनासाठी सीमालढ्याला बळ द्या

Published On: Mar 01 2018 1:44AM | Last Updated: Mar 01 2018 1:13AMखानापूर : प्रतिनिधी

कर्नाटक सरकारच्या  अत्याचाराचा घडा भरला असून न्यायदेवतेच्या दरबारात मराठी अस्मितेचा विजय निश्‍चित आहे. तोपर्यंत रस्त्यावरचा लढाही जिवंत ठेवणे गरजेचे आहे. सीमालढ्याच्या पाठीशी लोकबळाची ताकद उभी झाली पाहिजे. मायमराठीच्या संवर्धनासाठी सीमालढ्याला बळ देणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन तालुका म. ए. समितीचे अध्यक्ष माजी आ. दिगंबर पाटील यांनी केले.
 सीमाप्रश्‍न जागर अभियानानिमित्त बुधवारी नंदगड, कसबा नंदगड, हलगा, हत्तरवाड भागात घरोघरी जाऊन सीमाप्रश्‍नाविषयी माहिती देऊन जनतेला समितीशी एकनिष्ठ राहण्याचे आवाहन करण्यात आले. हलगा येथे माजी आ. पाटील यांनी मार्गदर्शन केले. जागर अभियानाने लढ्याला ऊर्जा व बळ मिळाले असून नव्या पिढीला सीमालढ्याच्या प्रवाहात सामील होताना बघून भविष्याची चिंता मिटल्याचे उद्गार त्यांनी काढले.

बुधवारी तालुका म. ए. समितीच्यावतीने 20 गावांमध्ये सीमाप्रश्‍न जागर अभियान राबविण्यात आले. माजी ता. पं सदस्य विठ्ठल गुरव म्हणाले, मराठी भाषक तरुण आज जातीय संघटना आणि पक्षांकडे आकर्षित होऊन स्वत्व गमावण्याच्या मार्गावर आहे. आपल्या जीवन- मरणाचा आणि जिव्हाळ्याचा असलेल्या सीमाप्रश्‍नाच्या लढ्याला बळ देण्याच्या कामात तरुणांनी समितीच्या पाठीशी उभे राहावे.
आबासाहेब दळवी म्हणाले, राज्यघटनेने दिलेल्या हक्कांची कर्नाटक सरकारकडून राजरोस पायमल्ली होत आहे. मराठीतून शासकीय कागदपत्रे आणि उतारे मिळत नसल्याने मराठी भाषक शेतकर्‍यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा मुजोर सरकारचा मुकाबला करण्यासाठी मराठी भाषकांच्या संघटित शक्तीची गरज आहे.

माजी अध्यक्ष विलास बेळगावकर, भूविकास बँकेचे चेअरमन मुरलीधर पाटील, के. पी. पाटील, प्रकाश चव्हाण, लक्ष्मण कसर्लेकर, महादेव घाडी, रुक्मान्ना जुंजवाडकर,  विवेक गिरी, अमृत पाटील, नारायण कापोलकर आदी सहभागी झाले होते.