Mon, Jul 22, 2019 04:29होमपेज › Belgaon › सुवर्णसौधला घेराव

सुवर्णसौधला घेराव

Published On: Aug 01 2018 1:21AM | Last Updated: Aug 01 2018 12:27AMबेळगाव : प्रतिनिधी

उत्तर कर्नाटकाचा विकास करा, अन्यथा उत्तर कर्नाटकमधील जनतेचा संयमाचा बांध फुटेल, असा इशारा शनिवारी मठाधीशांनी दिला. आंदोलनात माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पाही सहभागी झाले होते.

उत्तर कर्नाटकचा विकास करा, या मागणीसाठी मठाधिशांच्या नेतृत्वाखाली विविध संघटनांच्या वतीने सुवर्णसौधसमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. हुक्केरी मठाचे चंद्रशेखर स्वामी म्हणाले, कर्नाटक राज्याच्या निर्मितीनंतर आजपर्यंत उत्तर कर्नाटककडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. शैक्षणिक, पाटबंधारे, सामाजिक, आर्थिक आणि कृषीचा कोणताही विकास झालेला नाही. उत्तर कर्नाटकाने कर्नाटकाच्या विकासात मोठे योगदान दिले असतानाही दुर्लक्ष केले आहे. सहाशे कोटी खर्चून सुवर्णसौध बांधले तरीही तीत काहीही काम चालत नाही. आ. उमेश कत्ती म्हणाले की, अखंड कर्नाटक रहावे अशी आमची मागणी आहे. मात्र सातत्याने जर अन्याय होत गेल्यास येथील जनता पेटून उठल्याशिवाय राहणार नाही.

आंदोलनामध्ये विकास वेदीकीचे अध्यक्ष अशोक पुजारी,  निलकंठ स्वामी (बैलहोंगल), मुरुघेंद्र स्वामी (मुनवळ्ळी), शिवलिंग स्वामी (सौंदत्ती), चनमल शिवाचार्य, सिध्दराम स्वामी (नागनूर), संपादन स्वामी, राज संगम, डॉ. अभिनव स्वामी गुडसिध्द, शंकरगौड स्वामी यांच्यासह मठाधिश, शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, सहभागी झाले होते. विविध संघटनांच्यावतीने जिल्हाधिकार्‍यामार्फत मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांना निवेदन पाठवण्यात आले.

आंदोलनकर्त्यांच्या अशा आहेत मागण्या...

बेळगावच्या सुवर्णसौधमध्ये सचिवालय सुरू करण्यात यावे
बेळगावला कर्नाटकच्या दुसर्‍या राजधानीचा दर्जा देण्यात यावा
राज्याचे सहा महिन्यांचे अधिवेशन बेळगाव सुवर्णसौधमध्ये भरवण्यात यावे
उत्तर कर्नाटकच्या विकासासाठी स्वतंत्र अर्थसंकल्प मांडावा
उ. कर्नाटकातील समस्यांचे निराकारणाचा निर्णय सुवर्णसौधमध्ये घेण्यात यावा