होमपेज › Belgaon › निवेदनांतून झाली ‘मराठी’ हद्दपार?

निवेदनांतून झाली ‘मराठी’ हद्दपार?

Published On: Jul 28 2018 1:32AM | Last Updated: Jul 27 2018 11:55PMपतसंस्थेवर वीस लाखांचा दरोडा
चिकोडी : प्रतिनिधी
पतसंस्थेच्या शटरचे कुलूप तोडून प्रवेश करीत लॉकरमधील रोख 10 लाख 67 हजार  रुपयांसह  9  लाख 48 हजार किमतीचे 30 तोळे दागिने  सोन्याचे दागिने असा सुमारे 20  लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची घटना आज तालुक्यातील बेळकूड येथे घडली आहे.
माहिती मिळताच अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख रवींद्र गडादे यांच्यासह पोलिस अधिकार्‍यांनी श्‍वानपथक व ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले, पण चोरट्यांचा माग लागला नाही. बेळकूड येथील  सिद्धेश्‍वर अर्बन  क्रेडिट सौहार्द सोसायटीच्या शटरचे कुलूप पारीने तोडून अज्ञातांनी चोरी केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. चिकोडी पोलिसांना   कळविल्यानंतर पीएसआय संगमेश होसमनी घटनास्थळी दाखल झाले.
संस्थेच्या लॉकरमध्ये ठेवण्यात आलेले रोख 10 लाख, 67 हजार,  31 रकमेसह 30 तोळे सोन्याचे दागिने  लंपास केल्याचे उघडकीस आले. ही घटना गुरुवारी सायंकाळी 9 ते शुक्रवारी सकाळी 7 च्या दरम्यान घडल्याचे पोलिसांनी सांगितले. 
चिकोडी शहरासह तालुक्यात मागील वर्षभरात घरफोडी, दुकाने फोडीसह अनेक चोरीच्या घटना घडल्या आहेत. यात किरकोळ मुद्देमाल चोरीला गेला होता, पण मोठ्या प्रमाणात रोख रक्कम व सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना तालुक्यातील पहिलीच घटना असल्याचे पोलिसांनी सांगितले. 
याप्रकरणी संस्थेचे संचालक तुकाराम संतराम मोरे यांनी चिकोडी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. घटनास्थळी अतिरिक्त जिल्हा पोलिस प्रमुख रवींद्र गडादे, पोलिस उपाधिक्षक दयानंद पवार, सीपीआय मल्लनगौडा नायकर हे दाखल झाले. बेळगांवहून श्‍वान पथक, ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. यावेळी श्‍वान कांही अंतरावर घुटमळल्याने चोरट्यांनी गाडीने पसार झाल्याचे पोलिसांनी सांगीतले.

...................................................


मराठा समाजाचा अंत पाहू नका
खानापूर : वार्ताहर
गेल्या वर्षभरापासून सनदशीर मार्गाने आरक्षणाची मागणी करणार्‍या मराठा समाजाला न्याय मिळाला नाही. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात तसेच देश संरक्षणात महत्त्वाचा वाटा उचलणार्‍या समाजाला नेहमी वंचित रहावे लागले आहे. या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही. शूर असणार्‍या पण शांततेने मागणी करणार्‍या मराठा समाजाचा अंत पाहू नका, अन्यथा मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा मराठा नेत्यांनी प्रशासनाला दिला आहे. 
महाराष्ट्रात मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाने उग्र स्वरूप धारण केले आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात तिघांनी बलिदान दिले आहे. या मोर्चाला  पाठिंबा तसेच हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी मराठा     पान 7 

समाजाच्या वतीने खानापुरात सभा आणि रास्तारोकोचे आयोजन करण्यात आले होते. 
शिवस्मारकातील शिवपुतळ्यास हार घालून मोर्चाला सुरवात केली. त्यानंतर सर्कलमध्ये अर्धातास रास्तारोको करुन महाराष्ट्र शासनाचा निषेध केला. मोर्चात हौतात्म्य पत्करलेल्या काकासाहेब शिंदे, जगन्नाथ सोनवने व रोहन तोडकर यांना श्रध्दांजली वाहिली. तसेच तहसिलदार शिवानंद उळागड्डी यांना कर्नाटकातील मराठा समाजालाही आरक्षण मिळावे, या आशयाचे निवेदन सादर केले.
मराठा समाजातील तरुणांत कौशल्य, गुणवत्ता  आहे. मात्र, आरक्षणाअभावी  वाताहत झाली आहे. आजही समाजातील गरीब घटकाला हात पसरावे लागतात. नोकरीची संधी न मिळाल्याने बेरोजगारीचा सामना करावा लागतो. ह्या समाजाने मूक मोर्चा काढून शासनासमोर आपल्या समस्या मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र जाणीवपूर्वक काणाडोळा करण्याचा प्रकार महाराष्ट्रातील सरकारने केला आहे. म्हणूनच आता ठोक मोर्चा हाती घेण्याची वेळ आली आहे, असे विचार नगराध्यक्ष तसेच शिवसेनेचे तालुकाध्यक्ष नारायण मयेकर यांनी व्यक्त केले.
मोर्चात महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष देवापान्ना गुरव, गोपाळ पाटील, गोपाळराव देसाई, मारुती परमेकर, विठ्ठल बेळगावकर, पी.एच.पाटील, दिनकर मरगाळे, श्रीरामसेनेचे किरण तुडवेकर, पंकज कुट्रे, संजय गुरव आदींसह समाजबांधव मोठ्या संख्यने उपस्थित होते.
--------

बेळगावात चोरट्यांचा धुमाकूळ
बेळगाव : प्रतिनिधी
गोवावेस येथील शांतप्पाण्णा मिरजी को ऑप बँकेच्या शाखेमध्ये चोरीचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. बँकेचे समोरील शटर उघडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, आतील बाजूस असणार्‍या काचेच्या दरवाजामुळे चोरट्यांचा हा प्रयत्न फसला. शिवाय, शेजारी असणार्‍या प्लायवूड दुकानातही चोरीचा प्रयत्न करण्यात आला आहे. 
अर्धवट उघडे असलेले शटर पाहून सकाळी लोकांनीच घटनेची माहिती टिळकवाडी पोलिसांना दिली. गोवावेस येथील दत्तमंदिर समोर मुख्य मार्गावर या बँकेची शाखा असून आहे. मुख्य शटरचे कुलुप तोडुन चोरट्यांनी बँकेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र आतील बाजुस असणार्‍या काचेचा दरवाजा अडसर ठरल्याने त्यांचा हा डाव फसला. सदर दरवाजाही फोडण्यात आला. मात्र, चोरट्यांना आत प्रवेश करणे अशक्य ठरले. फुटलेल्या दरवाजाच्या काचा लागल्याने त्यांना येथून काढता पाय घ्यावा लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. कारण घटनास्थळी रक्तही पडले आहे. 
बँकेच्या बाजुला असणार्‍या प्लायवूड दुकानात ही चोरीचा प्रयत्न करण्यात आला आहे. या दुकानाच्या शटरचे कुलुप उचकटून दुकान फोेडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. घटनास्थळी गुन्हे विभाचे  उपायुक्त महानिंग नंदगावी,  टिळकवाडी पोलिस स्थानकाचे पोलिस निरिक्षक मौनेश देशनूर यांनी भेट देउन पाहणी केली. 

...........................


खासगी रुग्णालये
आज बंद राहणार
बेळगाव : प्रतिनिधी
इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) विविध मागण्यांसाठी शनिवारी देशव्यापी बंद पुकारला आहे. बंदमध्ये बेळगाव आयएमएचा सहभाग असून तातडीची सेवा वगळता बेळगावधील सर्व खासगी दवाखाने बंद राहतील, असे बेळगाव आयएमएच्या अध्यक्षा डॉ. सुचित्रा लाटकर यांनी कळविले आहे.
नॅशनल मेडिकल कौन्सिल विधेयकातील काही तरतुदींना आयएमएने विरोध करत सुधारणा सुचविल्या होत्या. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. लोकसभेत पुन्हा हे विधेयक चर्चेला घेतले जाणार आहे. त्यामुळे दबाव टाकण्यासाठी हा संप पुकारण्यात आला आहे.     पान 7 
यापूर्वी खासगी मेडिकल कॉलेजचे प्रवेश शुल्क सरकार ठरवत होते. त्यामुळे मेडिकलला प्रवेश घेणे मध्यमवर्गीयांच्या आवाक्यात होते. मात्र नव्या विधेयकाला जशीच्या तशी  मंजुरी मिळाल्यास खासगी मेडिकल कॉलेजच्या प्रवेश शुल्कावरील सरकारचे नियंत्रण हटणार आहे. परिणामी खासगी कॉलेज अव्वाच्या सव्वा फी आकारली जाण्याची भीती आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्राचा दर्जा घसरुन, जे श्रीमंत तेच फक्त मेडिकल शिक्षण घेतील, त्याचे दूरगामी परिणाम दिसून येतील, असे आयएमएचे म्हणणे आहे. याला विरोध म्हणून देशव्यापी बंद पुकारण्यात आला आहे. अपघात तसेच आपत्कालीन सेवा सुरु असेल. सहकार्य करण्याचे आवाहन  आयएमए अध्यक्षा डॉ. लाटकर यांनी केले आहे.

..............................................

शिनोळीत उद्या ‘मराठा’ आंदोलन 
बेळगाव : प्रतिनिधी
मराठा आरक्षणाबरोबर सीमाप्रश्‍नाची आग्रही मागणी घेऊन शिनोळी येथे रविवारी (दि.29) होणार्‍या आंदोलनात बेळगावमधून हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे, शहरातून निघताना प्रत्येकाने शांतता पाळावी आदी निर्णय घेण्यात आले. 
सकल मराठा समाजाची रामलिंगखिंड गल्लीतील जत्तीमठात शुक्रवारी शिनोळी येथे होणार्‍या आंदोलनाची पूर्वतयारी करण्यासाठई बैठक पार पडली. रविवारी  सकाळी 10 धर्मवीर संभाजी चौकातून महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून समाजबांधव निघणार आहेत.
गेल्या वर्षी महाराष्ट्रभर मोर्चे निघूनही मराठा आरक्षणाबाबत महाराष्ट्र व केंद्र सरकार ठोस निर्णय घेत नसल्यामुळे आता महाराष्ट्रात मराठा समाजाने ठोक आंदोलन सुरु केले आहे. त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठीच तसेच सीमाप्रश्‍नाकडे पुन्हा एकदा सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शिनोळीत बेळगावचा सकल मराठा समाज आंदोलन छेडणार आहे.
आंदोलन यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाने आपल्या घरातील लोकांना व मित्रमंडळींना यामध्ये सामावून घेणे. रविवार असल्याने कामगारांना सुट्टी असते. त्यामुळे प्रत्येकाने 2 ते 3 जणांना सोबत घेणे, दुचाकीस्वारांनी हेल्मेट परिधान करून आंदोलनाला येणे, असेही निर्णय घेण्यात आले.  
गुणवंत पाटील म्हणाले, मराठा आरक्षणाच्या मुद्याबरोबर बेळगावकरांसाठी सीमाप्रश्‍नाचा मुद्दा महत्वाचा आहे. यासाठी सीमाप्रश्‍नाची मागणीही या आंदोलनात असणार आहे. मराठा व मराठी टिकण्यासाठी अशी आंदोलने आयोजित करणे गरजेचे आहे. शिवराज पाटील, प्रकाश मरगाळे, प्रकाश शिरोळकर संजय मोरे, राजु मरवे, सतीश देसाई, एम. वाय. घाडी, प्रसाद बरगाळे, केदारी करडे, धनंजय पाटी, गणेश दड्डीकर, नितीन आनंदाचे, प्रविण तेजम आदी उपस्थित होते. 

.............................................................

‘उडाण’मुळे खासगी कंपन्यांचा बेळगावला ठेंगा
बेळगाव : अंजर अथणीकर
उत्तर कर्नाटक आणि पश्‍चिम महाराष्ट्रासाठी अत्यंत उपयुक्त  आणि सुमारे चारशे कोटी रुपये खर्चून सांबरा विमानतळ अत्याधुनिक केले असतानाही येथील महत्त्वाची विमानसेवा हुबळीला पळवण्यात आल्याने येथील उद्योजकांना फटका बसला आहे. 
या ठिकाणची विमानसेवा बंद करण्यापूर्वी दहा महिन्यात प्रवासी संख्या 7 हजार 400 वरुन 17 हजार 800 वर गेली. पण आता केवळ बंगळूरसाठीच सेवा सुरु ठेवल्याने अश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. हा सर्व प्रकार केवळ हुबळीसाठी ‘उडान योजना’ लागू केल्यामुळे झाला. 
सांबरा विमानतळ कर्नाटकातील सर्वात जुने आणि आता सर्व सोयीनी युक्त आहे. विमानतळ अत्याधुुनिक करण्यासाठी चारशे कोटी खर्च करण्यात आले. आता अगदी आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरु करण्याचीही सोय आहे. यापूर्वी मुंबई, हैदराबाद, चेन्नईसाठीची प्रवासी संख्या 7 हजार 400 वरुन 17 हजार 800 वर गेली होती. तिकिटाचे बुकिंग नेहमी फुल्ल असे. 
विमान प्राधिकरणाकडून ‘ उडाण योजना’ हुबळीसाठी लागू केल्याने तीन ते चार खासगी कंपन्या आता हुबळीकडे वळल्या आहेत. खासगी कंपन्यांना प्रत्येक प्रवासी सीटसाठी अठराशे रुपये अनुदान मिळते. यामुळे खासगी कंपन्यांनी मोर्चा हुबळीकडे वळवला. येथून आता सर्वच महत्त्वाच्या शहरांसाठी सेवा सुरु झाली आहे. बेळगावमध्ये केवळ अलाईन्स एअरची आठवड्यातून तीन वेळा बंगळूरसाठी सेवा सुरु आहे.
महिनाभरापूर्वी एअर इंडियाचे अधिकारी एम. बी. जोशी एका कार्यकमानिमित्त बेळगावला आले असता त्यांनी येथून ऑगस्टमध्येच मोठ्या शहरासाठी एअर इंडियाची सेवा सुरु करण्याचे अश्‍वासन दिले होते मात अद्याप तरी कार्यवाही झालेली नाही.
अनुदानाचा बुस्टर डोस कधी?
‘उडाण’अंतर्गत प्रत्येक प्रवाशामागे अठराशे रुपये अनुदान खासगी कंपन्यांना मिळते. आता ‘ उडाण योजना 3’ं अंतर्गत बेळगावला ऑक्टोबरमध्ये सेवा सुरु होण्याची शक्यता आहे. याला एअरपोर्ट अधिकार्‍यांनीही दुजोरा दिला आहे. आगामी तीन महिन्यात बेळगाव विमानतळ गजबजणार आहे.
(उत्तरार्ध)


....................................................

बेळगाव : प्रतिनिधी

जिल्हाधिकारी व जिल्हा पंचायत कार्यालयात जिल्हाभरातील नागरिकांकडून दररोज शेकडो मागण्यांची निवेदने देण्यात येतात. परंतु, यामध्ये अभावानेच मराठी भाषेतील निवेदने आढळतात. सीमाभागातील मराठी भाषकांकडून सर्रास कानडी अथवा इंग्रजी भाषेतून  निवेदने देण्यात येत आहेत. यामुळे निवेदनातून मराठी हद्दपार होत असल्याचे दिसून येते.

सीमाभागातील मराठी भाषकांवर कर्नाटक सरकारकडून कानडीकरणाचा वरवंटा फिरविण्यात येत आहे. यामुळे मराठी भाषा धोक्यात आली आहे. सरकारी कामकाजातूनही मराठी  हटविण्यात आली आहे. याचे प्रत्यंत्तर दररोज देण्यात येणार्‍या  निवेदनातून येते. 

सामाजिक संघटना आणि नागरिकांची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दररोज गर्दी झालेली असते. त्यांच्याकडून अधिकार्‍यासमोर गार्‍हाणी मांडण्यात येतात. तक्रारी मांडण्यासाठी निवेदने देण्यात येतात. निवेदने प्रामुख्याने कन्नड आणि इंग्रजीतून देण्यात येतात. निवेदनासाठी मराठीचा वापर टाळण्यात येतो. 

वास्तविक मराठी भाषकांकडून मराठीतून निवेदने देण्याची आवश्यकता आहे. पण सर्रास निवेदने त्यातून दिली जात नाहीत. परंतु अपवाद वगळता सर्वच मराठी भाषक आणि संघटनांकडून इंग्रजीचाच वापर अधिक करण्यात येत आहे. 

सरकारी अधिकारी प्रामुख्याने कानडी भाषिक असतात. त्यांना समजण्यासाठी कानडीचा वापर करण्यात येत असल्याची भूमिका कानडीचा वापर करणार्‍यांकडून मांडण्यात येते. मात्र, मराठीचे अस्तित्व जिवंत ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक मराठीचा वापर जाणीवपूर्वक करण्याची आवश्यकता आहे.

प्रशासकीय अधिकार्‍यांना नागरिकांच्या भाषेतील निवेदने स्वीकारून त्याच्यावर कार्यवाही करणे आवश्यक असते. मात्र, काही मराठीद्वेषी अधिकार्‍यांकडून मराठीचा दुस्वास करण्यात येतो. यामध्ये मराठीची गळचेपी होत आहे.

वास्तविक, जिल्ह्यात मराठी भाषक 23 टक्याहून अधिक आहेत. त्यांना कानडीबरोबर मराठीतून कागदपत्रे देण्याचा भाषिक अल्पसंख्याक कायदा आहे. त्याची सर्रास पायमल्ली करण्यात येते.